कड्या-कपारीत धरती नटली । दीड किलोमीटरवरून पाणी विहिरीत आणले-- पारंपरिक जलव्यवस्थाने केली गव्हाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:40 PM2019-12-28T18:40:03+5:302019-12-28T18:43:55+5:30
कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते.
सागर चव्हाण।
पेट्री : डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली, डोंगरांतील झऱ्याचे पाणी साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरून शेण, चिखल-मातीत सारवलेल्या आडात आणले जात आहे. या पाण्यावरच रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने केली जात आहे.
कास पठार भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची व मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस या झऱ्यांना खूप पाणी असते. उन्हाळ्यापर्यंत झ-याचे पाणी कमी होते. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.
शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते. या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर भिजवले जाते. गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी एक-दीड किलोमीटर अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात.
छिद्र लाकडापासून बनवला जातो ‘व्हॉल्व्ह’
आडात तीन इंच पाईपाएवढे एकदम तळाला छिद्र ठेवून त्यावर उभे लाकूड ठेवले जात होते. त्यानंतर चिखलाने छिंदे बंद केले जायचे. आड संपूर्ण भरल्यानंतर लाकूड हलविले की पाणी शेतजमिनीकडे पोहोचते. सध्या काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसविला जात आहे. डोंगर पट्ट्यात ही व्यवस्था आजही टिकून आहे. भात काढून गहू पेरल्यानंतर तो काढेपर्यंत भिजवण्यासाठी लागणा-या पाण्यासाठी ही पारंपरिक पद्धत वापरतात. किती पाणी साठवायचे? या अंदाजानुसार दसºयानंतर आड बनवला जातो. जननी, चिकनवाडी, एकीवमुरा, गोरेवाडी, गेळदरे येथे अशा पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे.
शेताच्या उंच ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंटमध्ये बंधारे बांधले तर डोंगरमाथ्यावरील शेतकरी बारमाही शेती करू शकतील. पाणी साठवणुकीसाठी तलाव बांधल्यास उत्तम प्रकारे शेती करू शकेल.
- गणपती गोरे, गोेरेवाडी, कुसुंबीमुरा
हा आड बारा ते पंधरा फूट लांब, सात ते आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून एका वेळेला दोन ते तीन गुंठे शेतजमीन भिजवली जाते.
-शिवाजी गोरे, गोरेवाडी.