मनोमिलनासोबत भाजपनेही
By admin | Published: November 9, 2016 01:11 AM2016-11-09T01:11:03+5:302016-11-09T01:11:03+5:30
भाजपवरही जोरदार टीकास्त्र
सातारा : ‘मनोमिलनाच्या प्रदीर्घ काळाच्या सत्तेमुळे शहराची बकाल अवस्था होऊन बसली आहे. मागील पाच वर्षांत शहरातील मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सध्या मनोमिलनापासून फारकत घेऊन स्वतंत्र लढणाऱ्या भाजप उमेदवारांनीदेखील सत्तेत राहून खीर ओरपली. हे लोक शहरातील नागरिकांना कसा काय न्याय देतील?,’ असा प्रश्न महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.
सीमा पवार यांनी मनोमिलनाच्या सत्तेसह भाजपवरही जोरदार टीकास्त्र झोडले. साताऱ्यात काँगे्रस, राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहिले नाहीत. दोन्ही पक्ष आघाड्यांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजप साताऱ्यात अच्छे दिन आणण्याच्या बाता मारत आहेत. परंतु त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार याआधी मनोमिलनाच्या सत्तेतच काम करत होत्या. मग त्यांना का अच्छे दिन आणता आले नाहीत? या सर्व पक्षांनी मिळून साताऱ्याच्या विकासाचा निधी लाटला आहे.
कायद्यानुसार वॉर्ड समित्या स्थापन करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. कोट्यवधींचा निधी शहराच्या विकासासाठी वापरल्याचे सांगितले जात असले तरी हा निधी कुठे मुरला? याचा हिशोब शहरवासीयांना द्यावा, मगच निवडणूक लढण्यासाठी पुढे यावे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
प्रचारानिमित्त प्रभागात फिरताना आलेले अनुभव सांगताना सीमा पवार म्हणाल्या, ‘प्रस्थापितांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लोकांना बदल हवा आहे. पाणी मुबलक असून, त्याचे व्यवस्थापन नाही. गरिबांच्या कस्तुरबा रुग्णालयाला अद्याप टाळे लागलेले आहे. शहरातील पाणी गळती काढली जात नाही. रेल्वे स्टेशनवरून साताऱ्यात यायला अथवा जायलाही सिटी बसची सुविधा नाही. मंडईत पाय ठेवायलाही जागा नसताना कोंडमारा सहन करत लोकांना भाजी खरेदी करावी लागत आहे. पालिकेत गेलो तर अडचणींची नोंद तर होतच नाही, शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. अस्वच्छतेमुळे लोक आजारी पडण्याची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून केली गेली आहे.’
शहरातील विकासकामांच्याही बोऱ्या उडाल्याचे सांगताना सीमा पवार यांनी ‘पालिका शाळांमध्ये बेंचेसची व्यवस्था नाही. मुलांना पोषक आहार दिला जात नाही. भाजप पॅक्ड फूड पुरविण्याची भाषा वापरून मल्टिनॅशनल कंपन्यांचे हित जोपासत आहे. शहरात असणारा दूध संघ बंद आहे. कस्तुरबा रुग्णालय बंद आहे. शहर सुधार समितीच्या माध्यमातून आम्ही याबाबत अनेकदा आंदोलन केली. परंतु दबंगशाहीमुळे कार्यवाही होताना दिसत नाही.’
‘आम्ही सातारकर पुण्या-मुंबईला रोजगार सप्लाय करणारे आहोत काय? साताऱ्यातील प्रस्थापितांच्या चुकीच्या कारभारामुळे रोजगारासाठी मुले साताऱ्याबाहेर जाऊन स्थायिक होत असून, त्यांचे आई-बाप तेवढे जुन्या घरात राहतात, मुलांशी त्यांचा इंटरनेट कॉलिंगद्वारे संपर्क होतो, त्यामुळे प्रस्थापितांनी साताऱ्यातील अशी अनेक घरे उद्ध्वस्त केली आहे.
(लोकमत टीम)२