LokSabha Result2024: साताऱ्यात अखेर कमळ फुलले, उदयनराजेंचीच कॉलर ताठ
By दीपक शिंदे | Published: June 4, 2024 05:16 PM2024-06-04T17:16:59+5:302024-06-04T17:19:30+5:30
..अन् शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं.
सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा, वाई, कऱ्हाड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि कोरेगाव या मतदारसंघांचा समावेश होतो. कराड दक्षिण आणि उत्तर या मतदारसंघांमधून उदयनराजे भोसले यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली. या मतदारसंघांमध्ये शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, याच ठिकाणाहून उदयनराजेंना अधिक मते मिळाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं.
वाई मतदार संघातून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले. कोरेगाव त्याबरोबरच सातारा तालुकाही शशिकांत शिंदे यांना सुरुवातीला चांगली आघाडी मिळाली. त्यानंतर, या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आणि कोरेगावात सुमारे पाच हजार, तर सातारा लोकसभा मतदारसंघात सुमारे २९ हजारांनी मताधिक्य मिळविले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी विजय मिळविला.
सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे विजयी होतील, अशा पद्धतीचे सुरुवातीच्या फेऱ्यांचे अनुमान काढले जात होते. सुरुवातीला सुमारे २१ हजारांचे मतांचे मताधिक्य हे शशिकांत शिंदे यांना मिळालं होते. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी विजयी मिरवणूक काढून आपला गुलालही उधळला. मात्र, काही कालावधीतच उदयनराजेंनी पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी घेतल्याने त्यांच्या या आनंदावरती विरजण पडलं. कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर हे खूप अटीतटीचे असलेले मतदारसंघ होते. या मतदारसंघांमधून भाजपने जोरदार मुसंडी मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कऱ्हाड या ठिकाणी सभा घेतली होती. या सभेचा निश्चितच फायदा उदयनराजेंना झाला, असे म्हणता येईल. त्याबरोबरच दक्षिण आणि उत्तरमधील कार्यकर्त्यांनीही भाजपचा चांगल्या प्रकारे केला, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी उदयनराजेंना लीड घेणं सोपं झालं, तसेच त्यांचा विजयही सुकर झाला.
साताऱ्यात भाजपचा पहिला खासदार
स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच स्थान मिळाले नव्हते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेसाठी भाजपचा पहिला खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत ही उदयनराजेंसाठी महत्त्वाची राहिली.