‘ग्रामपंचायत’बाबतचे भाजपचे दावे खोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:45 PM2017-10-18T23:45:07+5:302017-10-18T23:45:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे चित्र जनतेसमोर आले असते; परंतु ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाल्याचे खोटे दावे करून भाजप गुजरात निवडणुकीतील फंडा राबवत आहे,’ अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार मुंडे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप भरघोस यश मिळाल्याचा खोटा दावा करीत आहे आणि त्यास पंतप्रधानदेखील ट्विट करून अभिनंदन करतात. हे इतिहासात प्रथमच घडले आहे. तसेच हिमाचलच्या बरोबरीने गुजरातची निवडणूक ही आयोगाने जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, गुजरातमध्ये भूमिपूजने आणि उद्घाटने करण्याची संधी मिळावी, यासाठी गुजरात निवडणूक आयोगाने घोषणा केली नाही. यावरून निवडणूक आयोग देखील सरकारच्या दबावाखाली काम करतोय का? असा प्रश्न पडतो.’
सरकारने कर्जमाफी योजनेत चावडी वाचन घेऊन शेतकºयांचा अवमान केला आहे. राज्यात शेतीमालाला हमीभाव नाही, भारनियमनामुळे अर्धे राज्य अंधारात आहे. पेट्रोलसह महागाई प्रचंड वाढली असून, जनतेच्या मनात सरकार विरोधात रोष निर्माण झाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जेव्हा जनतेच्या लक्षात येते की, विकास होत नाही तेव्हा-तेव्हा भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला आहे. या सरकारचे खायचे आणि दाखवायचे दोन्ही दात वेगळे आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.
राजेंच्या वादाचा राष्ट्रवादीशी संबंध नाही
खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये आनेवाडी टोलनाक्यावरून जो वाद सुरू आहे, त्याच्याशी राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नाही.
या वादात पक्षनेतृत्वाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही वाद निर्माण झाला त्यावर पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार योग्य निर्णय घेतील, असे स्पष्टीकरणही मुंडे यांनी केले.