भाजप प्रवेशाचा निर्णय दादांशी बोलूनच!

By admin | Published: February 15, 2015 12:55 AM2015-02-15T00:55:56+5:302015-02-15T00:57:59+5:30

उदयनराजे : पक्षप्रवेशासाठी गळ घालणाऱ्यांची घेतली फिरकी; सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला घरचा आहेर

BJP decides to enter the decision with the elders! | भाजप प्रवेशाचा निर्णय दादांशी बोलूनच!

भाजप प्रवेशाचा निर्णय दादांशी बोलूनच!

Next

सातारा : ‘तुम्ही घराबाहेर राहून घरातली सफाई करू शकत नाही. त्यासाठीच मी या घरात राहिलोय. तुम्ही बाहेर राहून बाहेरची सफाई करा... मी या घरातली करतो. यालाच गनिमी कावा म्हणतात,’ असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपली भूमिका स्पष्ट करून पुन्हा एकदा आपला स्वपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. दरम्यान, ‘आपण भाजपमध्ये कधी प्रवेश करणार?’ असा आग्रह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी धरल्याने ‘भाजपमध्ये येण्याचा प्रवेश चंद्रकांतदादांशी बोलून ठरवतो,’ असंही त्यांनी मिस्किीलपणे सांगून टाकलं.


सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. १४) जिल्हा दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृहावर दुपारी पणन व बांधकाम खात्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार होती. त्याआधी उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसमवेत पाटील यांची भेट घेतली. अतिशय गोपनीय झालेल्या या भेटीप्रसंगी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, विजयकुमार काटवटे, नगरसेवक अ‍ॅड. विलास आंबेकर यांची उपस्थिती होती.


यावेळी डॉ. दिलीप येळगावकर आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी पत्रकारांच्या भूमिकेत उदयनराजेंना चुचकारले. ‘राजे तुमचा भाजप प्रवेश कधी होणार?,’ असा प्रश्न येळगावकरांनी विचारला. त्यावर ‘कसंय...तुम्हाला आधी भाजपमध्ये पाठवलंय. तुम्ही आता आमच्या पक्षाच्या बाहेर आहात आणि बाहेर असणाऱ्या माणसाला घरातलं साफ करता येत नसतं. त्यामुळे घरातलं साफ करायला मी आहे. तुम्ही बाहेरचं बघा, यालाच गनिमी कावा म्हणतात,’ असं उदयनराजेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही हसू आवरता आलं नाही. तसेच नाकावर घेतलेल्या चष्म्यातून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहून ‘भाजप प्रवेशाचं आम्ही दोघं खासगीत बोलून ठरवतो,’ असं सांगून आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचं उदयनराजेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.


उदयनराजेंनी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मंत्री पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा तयार केल्यास घाटातील अपघात टळतील व वाहतूकही सुरळीत होईल. तेव्हा या बोगद्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. पोवई नाक्यावर उड्डाण पूल तयार करण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. नाक्यावरील वाहतुकीचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच असल्याने हा पूल होणे आवश्यक आहे. गाव दत्तक योजनेत मी कोंडवे गाव दत्तक घेतले असून, या गावाला निधी मिळावा, अशा मागण्याही उदयनराजेंनी यावेळी केल्या. दरम्यान, साताऱ्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याबाबत आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासनही मंत्री पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)





 

Web Title: BJP decides to enter the decision with the elders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.