सातारा : भाजप मध्यस्थाकरवी व्यवहार करत नाही; हेच काँग्रेसचे दुखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:46 PM2018-10-05T15:46:01+5:302018-10-05T15:51:44+5:30
काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
सातारा : काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसचे दुखणे आहे. शंभर वेळा खोटे बोलून ते खरे होऊ शकत नाही, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मंत्री जावडेकर म्हणाले, राज्यातील २७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये २०० ग्रामपंचायती आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे लाट केवळ २०१४ ची नव्हती, तर गेल्या चारही वर्षात सर्व निवडणुकांत भाजपची वाढ झाली आहे.
सर्वसामान्य जनतेला सुशासन हवे आहे. जातीपातीच्या राजकारणाला लोक बळी पडत नाहीत. तसेच खोटेनाटे प्रचार करून लोक मते देत नाहीत, हे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांची लोकांच्यातील मान्यता संपुष्टात येत आहे.
भाजप विरोधकांना कोणताही मुद्दा हाताशी मिळत नसल्याने नसलेले मुद्दे चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांपासून सामान्य जनतेपर्यंत मोदींच्या विकास योजनांचा फायदा होत असल्याने लोक आमच्यासोबत
आहेत. राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील लोकच आता आम्ही मोदींच्या बरोबर असल्याचे सांगत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बँकांची कर्जे बुडविणाऱ्या कर्जदारांच्या विदेशातील मिळकतीही ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. बुडित खात्यातील कर्जे सरकारने माफ केलेली नाहीत. केवळ बँकांचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कर्जे थकीत कर्जदारांकडून कुठल्याही परिस्थितीत वसूल केली जातील, असेही मंत्री जावडेकर यांनी सांगीतले.
साताऱ्यात भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी असल्याचा दावा
सातारा जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकांत भाजपचे ९00 लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, असा दावा मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला. लोक सुशासनाला मते देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.