भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Published: June 5, 2024 04:04 PM2024-06-05T16:04:49+5:302024-06-05T16:05:34+5:30

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात, फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे निकालातून दाखवले 

BJP doesn understand Maharashtra, Rohit Pawar has attacked | भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

कराड : भाजपने आमचा परिवार फोडला, पक्ष फोडला.त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात भूमिका चालतील.पण त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही.महाराष्ट्रातील लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे त्यांनी निकालातून दाखवून दिले आहे.असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना नाव न घेता लगावला.

युवा नेते रोहित पवार बुधवारी कराडच्या प्रतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, यु्वा नेते सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर,प्रशांत यादव, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे,जशराज पाटील, सौरभ पाटील आदिंची उपस्थिती होती.

आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये लोकांच्या माध्यमातून आपल्या विचाराला लोकसभा निवडणुकीत यश मिळालेले आहे.त्यामुळे लोकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. खरंतर यशवंतराव चव्हाण यांचे विचार फक्त फोटो लावून मिळत नसतात. ते विचार जपावे लागतात. अन् ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ते विचार कायमच जपलेले आहेत. म्हणूनच यशवंत विचारप्रेमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी घेईल. त्याच्यात जास्तीत जास्त नवीन चेहरे पाहायला मिळतील.असेही पवार यांनी सांगितले.

अजित पवार पुन्हा कराडला आत्मक्लेश करण्यासाठी येतील ? 

यापूर्वी राजकारणात काही चुका झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी आत्मकलेश करण्यासाठी आले होते. याची आठवण करून देत अजित पवार पुन्हा कराडला आत्मक्लेश करण्यासाठी येतील का? याबाबत छेडले असता हा त्यांचा प्रश्न आहे असे रोहित पवार यांनी सांगणे पसंद केले.

म्हणून मी 'तसे' ट्विट केले 

'बच्चा बडा हो गया है!' असे आपण ट्विट केले आहे. नेमके हे तुम्हाला कोणाला सांगायचे आहे? असा प्रश्न विचारताच बच्चा म्हणून ज्यांनी आम्हाला या निवडणूक प्रचारात हिणवले होते. त्यांच्यासाठी माझे ते मत आहे. आता तर लोकांनी आम्हाला पाठिंबा देऊन निकालातून दाखवून दिले आहे की बच्चा कोण आहे ते. आम्ही तर स्वतःला आजही कार्यकर्ता समजतो. पण युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. असच मला सांगायचे आहे असे रोहित पवार म्हणाले.

सातारच्या पराभवाचा अभ्यास करावा लागेल

कराड परिसर हा यशवंत विचाराचा आहे. मात्र याच लोकसभा मतदार संघात यशवंत विचाराचा पराभव झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, खरंच हा निकाल अनपेक्षित लागला.आम्हा सर्वांना याबाबत अभ्यास करावा लागणार आहे.पण शशिकांत शिंदेंनी कमी वेळात दिलेली लढत ही निश्चितच चांगली आहे .भाजपच्या मोठ- मोठ्या नेत्यांनी सातारा मतदार संघात मोठी ताकद लावली होती. पैशाचा मोठा वापर झाला ही बाब आमच्या कानावर आली आहे.असेही पवार म्हणाले.

विचारांचा पराभव झाला हे महत्त्वाचे

पार्थ पवारांनंतर सुमित्रा पवार यांचा देखील पराभव झाला आहे. या पराभवांकडे तुम्ही कसे पहाता?असे रोहित पवारांना विचारताच ते म्हणाले, व्यक्ती महत्त्वाची नाही विचारांचा पराभव झाला हे जास्त महत्त्वाचे आहे.

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात 

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे १८ आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात आहेत? याबाबत आपण भाष्य केले आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, होय त्यांचे१८ ते १९ आमदार आमच्या पक्ष प्रमुखांच्या संपर्कात आहेत. पण त्यापैकी कोणाला सोबत घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे पक्षप्रमुखच ठरवतील. पण ज्यांनी अडचणीच्या काळात मदत केली त्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल.असेही ते म्हणाले. पण त्यांचे १२ आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत. हे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच ते१२ आमदार काय करतील ते पुढच्या काही दिवसात समोर येईल असेही ते म्हणाले.

Web Title: BJP doesn understand Maharashtra, Rohit Pawar has attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.