भाजप जोशात...राष्ट्रवादी पेचात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:06+5:302021-02-11T04:41:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठीची ठराव प्रक्रिया आता पुन्हा सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक ...

BJP is in full swing ... NCP is in trouble! | भाजप जोशात...राष्ट्रवादी पेचात!

भाजप जोशात...राष्ट्रवादी पेचात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठीची ठराव प्रक्रिया आता पुन्हा सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीशी लुटपुटूच्या लढाया करुन हात टेकलेली शिवसेना आणि काँग्रेस आता तहाच्या तयारीला लागलेली आहे तर शहरापुरता मर्यादित समजला जाणारा भाजप शस्त्रे परजून राष्ट्रवादीसमोर उभा आहे. सध्या तरी भाजप जोशात आणि राष्ट्रवादी पेचात असे चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीला कोरोना महामारीमुळे स्थगिती मिळाली होती. यामुळे तब्बल एक वर्ष जादाचा कालावधी हा विद्यमान संचालक मंडळाला मिळाला. आता जिथून ठराव प्रक्रिया थांबली होती, तिथून पुन्हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सहकार प्राधिकरण पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीची तब्बल १५ वर्षांपासून सलग सत्ता आहे. दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांची १९८७ पासून असलेली एकहाती सत्ता उलथवून टाकून राष्ट्रवादीने जिल्हा बँकेवर मांड ठोकली.

दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी निर्माण केलेले सत्तेचे हे वलय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम ठेवले. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादीचे अनेक संचालक भाजपमध्ये गेलेले आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, कांचन साळुंखे, प्रकाश बडेकर हे संचालक बाजूला गेल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झालेले आहे. तर आमदार जयकुमार गोरे, अनिल देसाई हे संचालक भाजपमध्येच आहेत. वाई, माण, खंडाळा, सातारा, जावळी या तालुक्यांतून राष्ट्रवादी विरोधातील नेते भाजपमध्ये गेले आहेत.

या परिस्थितीमध्ये पेचात सापडलेल्या राष्ट्रवादीशी तहाची बोलणी करुन आपल्या पारड्यात अधिक काय पडेल, यासाठी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी बेगमी सुरू केलेली आहे. तर भाजपही संख्याबळ वाढविण्याच्या दृष्टिने योजना आखताना पहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी लागणारे सहकारी संस्थांचे ठराव जमा करत असताना भाजपच्या नेत्यांनीही जोर लावला असल्याने राष्ट्रवादीपुढे आणखी संकट उभे राहिलेले आहे. सध्या तरी आमदार शशिकांत शिंदे आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे नेते वातावरणाचा अंदाज घेत असल्याचे पहायला मिळतात. तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील व बोपेगावचे नवनियुक्त सरपंच व बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी शांततेत आपले काम सुरू ठेवलेले आहे. वेळ आली की ठोका टाकायची, या नेत्यांची पद्धत असल्याने रणांगण पेटल्यानंतरच खऱ्या अर्थाने मोहिमांचे चित्र पुढे येणार आहे.

शिवसेना-काँग्रेसचीही तयारी

मागील निवडणुकीनंतर शिवसेनेला तज्ज्ञ संचालक पद मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांना संधी देण्यात आलेली नव्हती. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लागली तर शंभूराज देसाई अथवा त्यांच्या गटाची व्यक्ती बँकेत संचालक होऊ शकते.

चक्रव्यूहातील अभिमन्यू कोण?

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेले असल्याने जिल्हा बँक निवडणुकीत चक्रव्यूह तयार झालेले आहे. या चक्रव्यूहात सध्याच्या घडीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे एकमेकांशी लढताना दिसत आहेत. अजूनही अनेकजण चक्रव्यूहाबाहेरुनच डोकावताना दिसत असून रणांगण पेटल्यानंतर चक्रव्यूहातील अभिमन्यू कोण? ते समोर येणार आहे.

जिल्हा बँकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी : १४

भाजप : ६

काँग्रेस : १ (रिक्त)

एकूण : २१

लोगो : जिल्हा बँकेचे रणांगण

फोटो इमारतीचा वापरावा

Web Title: BJP is in full swing ... NCP is in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.