भाजप गटनेत्याने उगारले नगरसेवकावर पिस्तूल-सातारा पालिकेच्या पार्टी मीटिंगमध्ये राडा : तीन कोटीच्या निधीवरून हमरातुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:48 PM2018-04-17T23:48:36+5:302018-04-17T23:48:36+5:30
सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आलेल्या तीन कोटी निधीच्या वाटपावरून मंगळवारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की,
सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आलेल्या तीन कोटी निधीच्या वाटपावरून मंगळवारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गटनेत्यांकडून पक्षाचेच नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस यांच्यावर पिस्तूल रोखण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेने नाराज झालेले काही नगरसेवक बुधवारी मुंबईला रवाना होणार असून, ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पालिकेत मंगळवारी भाजप नगरसेवकांची कमराबंद बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. प्रारंभी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर शहर विकासासाठी नगरसेवकांना आलेल्या तीन कोटींच्या निधीचा मुद्दा चर्चेला आला. या निधीतूून सर्वसमावेशक कामे करावीत, सर्वांना समान निधी मिळावा, कामांचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना नगरसेवकांनी मांडल्या. निधी वाटपावरून खलबते सुरू झाली.
सर्व नगरसेवकांचा रोष गटनेत्यांकडे असल्याने सर्वांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. अखेर बाचाबाचीतून हा विषय थेट विकोपाला गेला. संतप्त झालेल्या गटनेत्यांनी सहकारी नगरसेवकांना एकेरी भाषा वापरली. यानंतर भाजप सरचिटणीस अधिकारवाणीने बोलू लागताच दोघांमध्ये हमरातुमरी व धक्काबुक्कीही झाली.
त्यानंतर आक्रमक गटनेत्यांनी चक्क स्वत:कडील पिस्तूलच आपल्या सहकारी नगरसेवकावर रोखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर सहकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला. यानंतर सायंकाळी भाजप जिल्हा परिषद सदस्यांच्या निवासस्थानी घडलेल्या प्रकाराबाबत पुन्हा बैठक झाली. या बैठकीत सर्वांची समजूूत काढण्यात आली. तोडगा न निघाल्याने नाराज नगरसेवक बुधवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत.
मंगळवारच्या पार्टी मीटिंगमध्ये निधी वाटपावरून तात्विक वाद झाला असला तरी मी कोणतीही मर्यादा ओलांडली नाही. पिस्तूल रोखण्याचा प्रकार घडला नाही.
- धनंजय जांभळे, गटनेता
भाजपमध्ये आजपर्यंत कधीच दंडेलशाहीसारखा प्रकार घडला नाही.मात्र, मंगळवारी जे घडले, ते अत्यंत धक्कादायक अन् पक्षासाठी धोकादायक आहे.
- विजय काटवटे, नगरसेवक