Gram Panchayat Election: कऱ्हाडमध्ये अनेक ठिकाणी अतुल भोसले समर्थकांचे गटच आमने-सामने, कासारशिरंबेत 'दिलजमाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:36 PM2022-12-14T12:36:16+5:302022-12-14T12:36:48+5:30
सरपंच पदासाठी चौरंगी लढत
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे समर्थकांचे गटच आमने-सामने आल्याचे चित्र आहे. मात्र कासारशिरंबे येथे त्यांचेच दोन गट यावेळी एकत्रित आले आहेत.त्यामुळे भोसले गटाची ही दिलजमाई निवडणूकीतील जमेची बाजू मानली जात आहे.
ग्रामपंचायतीसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थक कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील व माजी सरपंच बाबुराव यादव यांनी परस्पर विरोधी निवडणूक लढवली होती. मात्र त्याचे परिणाम समोर आले होते. त्यामुळे या दोघांनी यावेळी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकारणाची दिशा व डावपेच प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या निवडणुकीनुसार बदलत असतात. ग्रामपंचायत ते आमदारकीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये हा फरक प्रकर्षाने जाणवून येतो. आमदारकीसाठी एकत्र असणाऱ्या समर्थकांचा गट ग्रामपंचायतीसाठी एकत्र लढेलचं असं नाही. निवडणुकीच्या त्या त्या स्तरावर ही समीकरणं बदलत असतात.
कासारशिरंबे, ता. कराड या गावातील मागील पंचवार्षिक निवडणूक माजी सरपंच बाबुराव यादव यांनी 'एकला चलो रे' करत एकहाती किल्ला लढवला होता. मात्र त्यांना यशाप्रत पोहोचता आले नाही. त्यामुळे विरोधी आघाडीने बाजी मारली होती. पण त्याला भोसलेंच्या एका गटाचा हातभार लागला होता.
यंदाच्या निवडणुकीत श्री हनुमान कालिका ग्रामविकास पॅनेलचे माजी सरपंच बाबुराव यादव, कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील, माजी उपसरपंच शंभूराज पाटील हे भाजप नेते डॉ.अतुल भोसले गटाकडून पँनेल रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात बहुजन रयत पॅनेलकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक दादा पाटील, अँड. उदयसिंह पाटील समर्थक जयवंतराव बोंद्रे, सुदाम बोंद्रे गट तर अविनाश मोहिते समर्थक जयशंकर यादव गट एकत्रित लढत आहेत.
भोसले गटातर्फे श्रीकांत यादव तर विरोधी गटाकडून उमेश महाजन यांच्यात थेट सरपंच पदासाठी लढत पाहायला मिळत आहे. सरपंच पदासाठी अन्य दोन अपक्षही रिंगणात आहेत.त्यामुळे कोणाची मते कोण खाणार? नक्की कोण बाजी मारणार ?याबाबत उलट- सुलट चर्चा सुरू आहेत.
'कडवी झुंज' स्मरणात
कासारशिरंबेतील गत पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय गट एकत्रित लढले होते. यांच्या विरोधात माजी सरपंच बाबुराव यादव यांनी एकाकी कडवी झुंज दिली होती. सरपंच पदासाठी सुमारे २ हजार ८०० मतांपैकी १ हजार १६५ मते एकट्या बाबुराव यादव यांनी मिळवली होती. तर १ हजार ६३५ मते विरोधी गटाला मिळाली होती. बाबुराव यादव यांची ही 'कडवी झुंज' आजही ग्रामस्थ आवर्जून सांगतात. यंदा निवडणुकीसाठी सुमारे ३ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सरपंच पदासाठी चौरंगी लढत
सरपंच पदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. भोसले गटातर्फे श्रीकांत यादव तर अँड. उदयसिंह पाटील समर्थक उमेश महाजन रिंगणात आहेत. तर पॅनेल व्यतिरिक्त दोन अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक भगवान यादव व अविनाश मोहिते समर्थक महेश यादव सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.