तिरंगी लढतीत भाजपला गळती
By admin | Published: November 2, 2016 11:10 PM2016-11-02T23:10:37+5:302016-11-02T23:10:37+5:30
नेत्यांची डोकेदुखी वाढली : प्रभाग १२ मध्ये सर्वात जास्त उमेदवार
फलटण :नगरपालिकेची निवडणूक प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपा, शिवसेना अशी तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपाला मोठी गळती लागल्याने त्यांचे उमेदवार शेवटपर्यंत किती राहणार हे अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशीच स्पष्ट होणार आहे.
फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने कोणाचा अर्ज राहील, कोण फायद्याचा व कोण तोट्याचा ठरेल याचे आराखडे मांडण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत. अर्जाची छाननी प्रक्रिया संपल्यानंतर आता आपापल्या दृष्टीने काहींचे अर्ज ठेवण्याचा तर काहींचे अर्ज काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १७ तर नगरसेवकांच्या २५ जागांसाठी २०१ अर्ज दाखल झाले आहेत. अपक्षांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. १२ प्रभागांतून दहापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. सर्वच प्रभागांत इच्छुकांचे अर्ज जास्त आल्याने कोणाला खाली बसवायचे. कोणाला उभे ठेवायचे याचे राजकीय आराखडे बांधण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत. तारक आणि मारक अपक्ष उमेदवारांना गळाशी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतेमंडळींचा एकास एक लढत व्हावी यासाठी अद्यापही प्रयत्न सुरूच आहे. मात्र, एकास एक जरी उमेदवार उभे करता आले नाही तरी कोणाचा अर्ज राहिला तर फायदा होईल, याचा विचार सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नीता नेवसे तर राष्ट्रीय काँग्रेसने सुवर्णा पवार व मदलसा कुंभार यांना उमेवारी दिली आहे. काँग्रेसकडून सुवर्णा पवार यांचाच नगराध्यक्षपदासाठी अर्ज राहण्याची शक्यता आहे. बसपाने रुक्मिणी मंजुळेकर यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने नगरसेवक पदासाठी कोणताच उमेदवार उभा न करता फक्त नगराध्यक्षपदासाठीच उमेदवार उभा केल्याने मागासवर्गीय समाजाच्या मतदानाचा व इतर समाजाच्या मतदानाचा यातून फायदा साधण्याचा प्रयत्न बसपा करीत आहेत. (प्रतिनिधी)
आराखडे बांधण्यात नेते व्यस्त !
४नगराध्यक्षपदासाठी १७ अर्ज आल्याने प्रत्येक समाजाने आपापला उमेदवारी अर्ज भरला आहे. एवढे प्रचंड प्रमाणात आलेले अर्ज पाहता जातीपातीचा मतदानाचा परिणाम होऊ नये म्हणून नगराध्यक्षपदासाठी कमीत कमी उमेदवार उभे राहतील. यासाठी नेतेमंडळींचा प्रयत्न सुरू आहे.
४सध्या इच्छुकांच्या जास्त संख्येचे महत्त्व लक्षात घेऊनच आराखडे बांधण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत.