भाजपने कोणताही ठपका नसणाऱ्यांना मंत्री केलय - मंत्री सुरेश खाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 07:31 PM2022-08-13T19:31:42+5:302022-08-13T19:47:34+5:30

'ईडी' काय कोणावरही कारवाई करायला 'येडी' आहे का?

BJP made ministers who had no blame says Minister Suresh Khade | भाजपने कोणताही ठपका नसणाऱ्यांना मंत्री केलय - मंत्री सुरेश खाडे

भाजपने कोणताही ठपका नसणाऱ्यांना मंत्री केलय - मंत्री सुरेश खाडे

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : कोणाला मंत्री करायचे हा तर ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपने मात्र ज्येष्ठ, विधानसभेत निवडून आलेले व ज्यांच्यावर कोणताही ठपका नसणाऱ्यांना मंत्री केले आहे. असे मत मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. संजय राठोड यांना मंत्री केल्यावरून चित्रा वाघ नाराज आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना खाडे बोलत होते.

शिंदे फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले नवनिर्वाचित मंत्री सुरेश खाडे प्रथमच सांगलीला निघाले होते. जाताना कराड येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, मुकंद चरेगावकर आदींची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटपाला झालेला उशीर हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. येत्या दोन-चार दिवसात ते होऊन जाईल. पण गत अडीच वर्षात ज्यांच्याकडे खाती होती त्याचा जनतेला काय उपयोग झाला? असा सवाल त्यांनी केला. उलट नवीन सरकार स्थापन झाल्याने अडीच वर्ष त्रास भोगणाऱ्या जनतेला आनंद झाला आहे. आलेले सरकार हे त्यांना रामराज्य वाटत आहे असे खाडे म्हणाले.

महिलांना मंत्रिमंडळात स्थान नाही? याबाबत विचारताच खाडे म्हणाले, अजून मोठा विस्तार बाकी आहे. महिलांना संधी मिळणारच आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या नाराजी बाबत विचारले असता त्यांना पक्ष लवकरच मोठी जबाबदारी देईल असे त्यांनी सांगितले.

तुमचा परिवार यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रात नवीन उद्योग आणण्यासाठी आपले काय प्रयत्न राहतील? त्यावर बोलताना मंत्री खाडे म्हणाले, याबाबत सविस्तर अभ्यास करून योग्य ते प्रयत्न करणार आहोत.

'ईडी' काय 'येडी' हाय का?

भाजप ईडीच्या चौकशी मागे लावत आहे असे विरोधक म्हणतात. असा प्रश्न विचारताच मंत्री खाडे म्हणाले, ईडी पुरावा हातात घेतल्याशिवाय कोणावरच कारवाई करत नाही. त्यांच्या फेऱ्यात जे अडकतात ती तर त्यांच्या कर्माची फळे असतात. उद्या तुम्ही आमच्या मागे हवे तर ईडी लावा. 'ईडी' काय कोणावरही कारवाई करायला 'येडी' आहे का? असा सवाल मंत्री खाडे यांनी केला. तर ईडी च्या कचाट्यात अडकलेले लवकर बाहेर पडणार नाहीय असेही एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

मागून काही मिळत नाही ..

पूर्वी तुमच्याकडे सामाजिक न्याय खाते होते. यावेळी पुन्हा तेच मिळेल अशी चर्चा आहे? याबाबत विचारताच भाजपमध्ये मागून काही मिळत नाही. मंत्रीपद काय मागून मिळालेले आहे का? त्यामुळे जे खातं देतील त्याचं चांगलं काम करायचं असेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

Web Title: BJP made ministers who had no blame says Minister Suresh Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.