भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:25 PM2022-04-14T16:25:15+5:302022-04-14T16:29:53+5:30
दहिवडी पोलिसांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मायणी : मृत पिराजी विष्णू भिसे यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून बनावट व्यक्ती उभी करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी मायणी येथील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. त्यावरून दहिवडी पोलिसांनी आमदारजयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मायणी येथील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मायणीतील वडिलोपार्जित जमीन गट नंबर ७६९, ७८१, ८१२ ही असून तिची वहिवाट महादेव भिसे आणि त्यांचे भाऊ करीत आहेत. त्यांचे वडील पिराजी विष्णू भिसे यांचा ८ ऑक्टोबर २०१६ रोजी मायणी येथे मृत्यू झाला आहे. त्यांचे वारस म्हणून महादेव भिसे, भाऊ शंकर, हरी, विठ्ठल, पुतण्या शुभम शिवाजी भिसे, बहीण लक्ष्मी नाथा वायदंडे व रुक्मिणी शशिकांत अवघडे, आई नमुनाबाई पिराजी भिसे आहेत.
वडिलोपार्जित मिळकत गट नंबर ७६९ लगत गट नंबर ७६८ ही छत्रपती शिवाजी एज्युकेशन मायणीतर्फे तत्कालीन अध्यक्षांच्या मालकी कब्जे वहिवाटीची आहे. या मिळकतीच्या अनुषंगाने संबंधित मिळकत वडिलोपार्जित मिळकतीतून संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या संस्थेच्या मिळकतीत जाण्यासाठी सहायक संचालक नगररचना सातारा यांच्या कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्याप्रमाणे संबंधित रस्त्याची रुंदी मंजूर सातारा प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियमानुसार १५ मीटर इतकी आवश्यक असल्याने गट नंबर ७६९ मधून जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असणे बंधनकारक होते.
त्यावेळी जयकुमार गोरे यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी माण-दहिवडी यांच्यासमक्ष ११ डिसेंबर २०२० रोजी प्रतिज्ञापत्र केले. ते ॲफिडेव्हिट नं. ४३००\२०२० ने नोंदले आहे. पिराजी विष्णू भिसे यांचा ८ ऑक्टोबर २०१६ रोजी मृत्यू झालेला असताना त्यांच्याजागी कोणी तरी व्यक्ती उभी केली.
त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून साक्षीदार दत्तात्रय कोंडीबा घुटुकडे, महेश पोपट बोराटे यांच्याशी संगनमत करून प्रतिज्ञापत्राकरिता श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याहस्ते दत्तात्रेय धोंडीबा घुटुकडे (रा. विरळी, ता. माण) यांच्यानावे शंभर रुपयांचा मुद्रांक घेऊन जयकुमार भगवान गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटुकडे, महेश पोपट बोराटे, अनोळखी इसम पिराजी विष्णू भिसे यांच्यानावे ॲफिडेव्हिट करणारी व्यक्ती, बनावट आधारकार्ड करणारा यांनी भिसे कुटुंबाची फसवणूक केली. मृत पिराजी भिसे यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र करण्याचा व ते सहायक संचालक नगररचना सातारा, उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या कार्यालयात दाखल करून फसवणूक केली आहे.