साताऱ्यात पेटलं ‘भाजप-राष्ट्रवादी’ वाक्युध्द
By admin | Published: October 19, 2015 10:53 PM2015-10-19T22:53:32+5:302015-10-19T23:42:43+5:30
बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्या--कांताताई नलावडे : भाजप लोकसंवादातून करणार वर्षपूर्ती आणल्याचा दावा; भाजप लोकसंवादातून करणार वर्षपूर्ती
सातारा : ‘बारामतीतही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे; पण पवारांच्या दबावामुळे या आत्महत्या सरकारी नोंदीवर येत नाहीत,’ असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. बारामती शहर सोडता पाच किलोमीटर अंतरावर पिण्याचे पाणी मिळत नाही, बारामती व विद्या प्रतिष्ठान एवढ्याच गोष्टींचे भांडवल करून वरिष्ठ नेत्यांना बारामतीत बोलावले जाते,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने भाजप लोकसंवादातून केलेल्या कामांची माहिती राज्यभर पोहोचविणार आहे. दि. १९ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत भाजप वर्षपूर्ती सप्ताह राबविणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कांताताई नलावडे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांतील कुशासनाला कंटाळलेल्या जनतेने गेल्यावर्षी विधानसभेत सत्तांतर घडवून आणले. दुष्काळाच्या कामावर आघाडी सरकारने केवळ १ हजार ३०० कोटी १५ वर्षांत खर्च केले. भाजपने अवघ्या वर्षात ८ हजार कोटी खर्च केले. राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. छावणीपासून दावणीपर्यंत चारा नेण्याचे धोरण राबविले आहे. राज्याला आॅक्टोबर २०१४ पासून जादा दुधाचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकारी संस्थांकडील अतिरिक्त दूध शासकीय दराने स्वीकारून येणारा खर्च व तोटा शासनाने सहन करावा, असा निर्णय घेतला. जलयुक्त शिवाराच्या कामांद्वारे तीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. आघाडी शासनाने १५ वर्षांत २४ हजार कोटी खर्च करून अवघे सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. त्याच जागी भाजपाने ६ हजार २०० गावे हिरवीगार केली. आरोपींना शिक्षा होण्याचा वेगही वाढला आहे. पोलीस ठाणी आॅनलाईन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. मुद्रांक शुल्काच्या दरात कपात केल्याने अवघ्या २०० रुपयांनी वारस नोंदी होत आहेत. रक्ताच्या पिशवीचे दरही तब्बल २५० रुपयांनी कमी केले आहेत. घरगुती विजेच्या दरात पाच टक्के तर औद्योगिक विभागाच्या वीज दरात दहा टक्के कपात केली आहे.’
भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक किशोर गोडबोले, रवी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटणचे चार कृषी विभागाचे कर्मचारी निलंबित
पाटण तालुक्यातील एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमअंतर्गत कामांची बिले काढताना अफरातफर केल्याप्रकरणी कृषी विभागाचे चार कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषी सहायक एम. पी. कूवर, कृषी पर्यवेक्षक व्ही. बी. बहादुरे, मंडल कृषी अधिकारी एस. एस. सावंत, तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव विभागीय कृषी सह संचालकांनी शासनाकडे सादर केला होता.
कुशासनाला जनता कंटाळली
आघाडीच्या शासनाच्या कारभाला जनता कंटळली होती. त्यामुळेच विधानसभेत सत्तांतर घडवून आणले. दुष्काळाच्या कामावर आघाडी शासनाने भरमसाठ पैसा खर्च केला आहे; पण भाजपाने हा खर्च कमी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.