भाजप-राष्ट्रवादीकडून खेचाखेची !
By admin | Published: January 19, 2017 11:25 PM2017-01-19T23:25:55+5:302017-01-19T23:25:55+5:30
कुरघोड्यांचे राजकारण : काँगे्रसची भूमिका गुलदस्त्यात; सेनेचे ‘एकला चलो रे’ धोरण
सागर गुजर ल्ल सातारा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादीला भाजपने मैदानात उतरून थेट आव्हान दिले आहे. या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची ओढा-ओढ सुरू केली असून, अनेक महारथींनी पक्ष बदल केला आहे. येत्या दोन दिवसांत साताऱ्याच्या राजकारणात मोठमोठे बाँब फुटण्याची चिन्हे आहेत.
सातारा जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोन पक्षच एकमेकांचे प्रबळ विरोधक मानले जात होते. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्वच म्हणजे ११ पंचायत समित्यांवर आपली सत्ता मिळवली. मात्र, या प्रत्येक संस्थेत काँगे्रसचे संख्याबळ उल्लेखनीय असेच राहिले आहे. या निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे.
मैदान तेच असले तरी या मैदानात होणाऱ्या कुस्त्यांचे पैलवान बदलल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यापूर्वी खारिक खोबऱ्यावर कुस्त्या करणारी भाजप आता मुख्य कुस्तीकडे वळली आहे. राष्ट्रवादीचा प्रबळ विरोधक असणारा काँगे्रस पक्ष अजूनही निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करायला समोर आला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जाणार आहेत; परंतु या पक्षातील अंतर्गत बेदिली लपून राहिलेली नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याने विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील यशामुळे बाळसे धरलेली काँगे्रस पुन्हा कोमात गेल्याचे सध्याचे चित्र आहे.
साहजिकच ऐन रंगात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या फडात काँगे्रस ऐवजी भाजपचे नेते ‘इनाम’ जाहीर करून नाराजांना आवतन देऊ लागली आहेत. बंडखोरीला उधाण आले असून, नाराज मंडळी आपल्या पूर्वीच्या पक्षाविरोधात जोरदार दंड थोपटू लागली आहेत.
कऱ्हाड दक्षिण, माण-खटाव या विधानसभा मतदार संघात ताकद दाखवा, असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिले आहेत. विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून आपल्या ताकदीवर या दोन्ही मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढविण्याचा सल्लाही खासदार पवार यांनी दिल्याचे समजते.
शिवसेनेचे मात्र एकला चलो रे भूमिका कायम आहे. दि. १९ रोजी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडून शिवसेना कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा असल्या तरी त्यांचा दौरा केवळ खटावपुरताच मर्यादित राहिला असल्याने शिवसेनेची स्थानिक नेतेमंडळी बुचकुळ्यात पडली आहेत.
राजेंच्या ‘राजधानी’ सोबत कमळ !
खा. उदयनराजे भोसले यांनी ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ‘राजधानी सातारा आघाडी’च्या नावाने सर्वच पक्षांतील नाराजांना हाक दिली आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकेला ओ दिली; परंतु आपण प्रतिसाद दिला असताना पुढे काय? असा प्रश्न ओ देणाऱ्यांना पडला आहे. खा. शरद पवार यांनी मात्र खा. उदयनराजे यांच्याविरोधात कोणतीच भूमिका घेतलेली नाही. ताकद सिध्द करेल, तो आपला...असंच खा. पवार यांनी उदयनराजेंविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना यानिमित्ताने सुचविले आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांची राजधानी सातारा विकास आघाडी भाजपसोबत जाण्याची शक्यताही राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदारपणे वर्तवली जात आहे.