भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचे ‘सिंचन’!

By admin | Published: October 19, 2015 11:18 PM2015-10-19T23:18:36+5:302015-10-20T00:22:00+5:30

साताऱ्यात कलगीतुरा : तटकरेंविरोधातील आरोपाला मुंडेंकडून प्रत्युत्तर

BJP-NCP's 'irrigation' of allegations and reactions! | भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचे ‘सिंचन’!

भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचे ‘सिंचन’!

Next

सातारा : ‘सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आरोपींच्या पिंजऱ्यात असून, ते लवकरच तुरुंगात दिसतील,’ असे भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी सांगितले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ता असल्याने भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करीत असून, ते या आरोपांतून तावून-सुलाखून निघतील, असे प्रतिपादन केले. राज्यातील फडणवीस सरकार ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती करीत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरातील भाजपने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी भाजप प्रवक्त्या माजी आमदार कांताताई नलावडे यांनी सोमवारी दुपारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती. ‘आघाडी सरकारने मागील १५ वर्षांत अनावश्यक धरणे बांधली,’ असा आरोप कांताताई नलावडे यांनी केला. तोच धागा पकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी ‘सिंचन घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश असल्याने तेही काही दिवसांत तुरुंगात दिसतील,’ असे म्हटले.
दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असतानाच धनंजय मुंडे विश्रामगृहावर आले. ते एका दालनात थांबले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकारांनी
त्यांची भेट घेऊन भाजप जिल्हाध्यक्षांनी
केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता मुंडे म्हणाले, ‘सत्ता असल्याने भाजप पदाधिकारी असे
आरोप करीत आहेत. ‘सिंचन’ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशीला आमचे नेते सामर्थ्याने सामोरे जात आहेत. सत्तेत नसताना घोटाळ्यांचे आरोप झालेल्या भाजपच्या नेत्यांना सत्ता आल्यावर पक्षाने क्लीन चिट दिली आहे,’ असा पलटवारही त्यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: BJP-NCP's 'irrigation' of allegations and reactions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.