gram panchayat election: कऱ्हाडमध्ये तालुकाध्यक्षांच्या गावातच 'भाजप' मध्ये दुही!, वडील आणि मुलाचे वेगळे पॅनेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:14 PM2022-12-10T12:14:39+5:302022-12-10T12:17:28+5:30
सुमारे १५ वर्षापासून गावात डॉ. अतुल भोसले समर्थकांची सत्ता
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावणारे गाव म्हणजे आटके!या गावची ग्रामपंचायत निवडणूक सध्या सुरू आहे. भाजप कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील याच गावचे; पण कराड दक्षिणेत कमळ फुलवण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या धनाजी पाटलांच्या गावातच मात्र 'भाजप'त दुही निर्माण झाल्याचे दिसत आहे. आता याची तालुक्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा झाली नाही तर नवलच !
आटके ग्रामपंचायतीत सध्या पैलवान धनाजी पाटील यांच्या गटाचीसत्ता होती. या निवडणुकीतही पैलवान धनाजी पाटील व कृष्णा बँकेचे माजी संचालक प्रमोद पाटील यांनी मुकुंद महाराज ग्रामविकास आघाडी रिंगणात उतरवली आहे. त्या विरोधात भाजपचेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गुणवंतराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी परिवर्तन ग्राम विकास आघाडी उभी केली आहे.
यात कृष्णा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे संचालक गजेंद्र पाटील, भैरवनाथ सोसायटीचे अध्यक्ष अरविंद पाटील, कोयना सहकारी बँकेचे संचालक अजित पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. राजेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते समर्थक विजयसिंह पाटील, राजेश पाटील, कारखान्याचे माजी संचालक मानसिंगराव पाटील ज्येष्ठ नेते माणिक पाटील या साऱ्यांचा सहभाग आहे.
राजकीय दृष्ट्या आटके गावाला खूप महत्त्व आहे. कृष्णा साखर कारखाना, कृष्णा सहकारी बँक, कोयना बँक, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती आदीचे पदाधिकारी अपवाद वगळता या गावात कायम राहिले आहेत. त्यामुळे साहजिकच या गावात आपलीच सत्ता असावी म्हणून चांगला संघर्ष पाहायला मिळतो.
सुमारे १५ वर्षापासून गावात डॉ. अतुल भोसले समर्थकांची सत्ता आहे. यंदा मात्र भाजपच्याच डॉ. अतुल भोसले समर्थकांच्यात दुही आहे.त्यामुळे यात कोण बाजी मारणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
डॉ. अतुल भोसलेंच्या भूमिकेकडे लक्ष
आटके ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांना मानणारे कार्यकर्ते दोन गटात विखुरले गेले आहेत. त्यामुळे डॉ.अतुल भोसले नेमकी कोणाला आणि कशी मदत करणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
वडील आणि मुलाचे वेगळे पॅनेल
कृष्णा कारखान्याचे संचालक गुणवंतराव पाटील हे परिवर्तन पॅनेलचे शिलेदार आहेत. तर त्यांचे सुपुत्र कृष्णा बँकेचे माजी संचालक प्रमोद पाटील हे मुकुंद महाराज पॅनलचे शिलेदार आहेत. याचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे.
नेत्यांच्या एकत्रित छबी चर्चेच्या
परिवर्तन आघाडीच्या फलकांवर पृथ्वीराज चव्हाण ,डॉ.सुरेश भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, डॉ.अतुल भोसले, अँड.उदयसिह पाटील, अविनाश मोहिते आदींच्या छबी एकत्रित दिसत आहेत. त्याचीही चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीवर काय होणार परिणाम?
आटके हे गाव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्या गटात महत्त्वाची भूमिका बजावणारे गाव. पण याच गावात भाजपमध्ये दोन गट निर्माण झाल्याने नजीकच्याच्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्याचे काय परिणाम दिसतील? हे पहावे लागेल.