धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे
By प्रमोद सुकरे | Published: November 13, 2022 11:32 AM2022-11-13T11:32:09+5:302022-11-13T11:32:53+5:30
नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कराड : धनगर समाजाला वैभवशाली इतिहास आहे. संघटित समाजच संघर्ष करू शकतो हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर या समाजाने केवळ पारंपारिक व्यवसायात न अडकता उच्चशिक्षित पिढी तयार केली पाहिजे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी भाजप त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बावनकुळे बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर ,सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ.अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
बावनकुळे म्हणाले, धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. सन २०१९ ला अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर लढले. त्यावेळी त्यांना भाजपने शब्द दिला होता तो भाजपने पाळला. त्यांना आमदार केले. गत अडीच वर्षात पडळकरांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडले होते. त्याचप्रमाणे कराड दक्षिणमधील विरोधकांना तुम्ही संघशक्तीने सळो की पळो करून लावा. भाजप तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला आहे. चाळीस-पन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही धनगर समाजाचे प्रश्न आहे तसेच राहिले आहेत. त्यांचा फक्त मतांसाठी वापर करून घेण्यात आला. यापुढे तसा वापर होऊ देऊ नका. भाजपच तुम्हाला न्याय देऊ शकतो हे लक्षात घ्या .
डॉ. अतुल भोसले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले .अन आजही सत्ता आल्याने ते घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण मूळच्या स्थानिक लोकांनी राजकारण जरा बाजूला ठेवावे. काम करणाऱ्या प्रत्येकाला इथे संधी मिळेल पण संधी मिळण्यासाठी काम करू नका. सत्तेची, पदाची अपेक्षा न ठेवता काम करा. असा कानमंत्रही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
ते तर बेईमानी सरकार!
आता राज्यात आपले सरकार आले आहे. पण अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार हे तर बेईमानीने सत्तेवर आलेले सरकार होते. अशी टीका डॉ.अतुल भोसले यांनी भाषणात केली. पण बेईमानी फार काळ टिकत नाही. आता आलेले सरकार धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कराड दक्षिणचा मोठा वाटा असेल
आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल. त्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असेल, असे डॉ अतुल भोसले यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.