तुमच्या मनात, तेच माझ्याही; साताऱ्याच्या उमेदवारीवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी सोडलं फर्मान
By नितीन काळेल | Published: March 14, 2024 01:23 PM2024-03-14T13:23:05+5:302024-03-14T13:23:42+5:30
मध्यरात्रीपर्यंत कोअर कमिटीची बैठक : महायुतीचे काम करण्याचेही सोडले फर्मान
सातारा : कऱ्हाड तालुक्यातील कार्यक्रमाला आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात बुधवारी मध्यरात्रीपर्यंत कोअर कमिटीची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना केली. तसेच साताऱ्याच्या लोकसभा उमेदवारीबद्दल अधिक भाष्य न करता तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे असे सांगत महायुतीचे काम पूर्ण क्षमतेने करण्याचे फर्मानही सोडले.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीत तिढा वाढत चालला आहे. शिवसेनेचा मतदारसंघ असलातरी सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे केले जात आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच सातारा लढविण्याचे जाहीर केले. तर तीन दिवसांपूर्वी कऱ्हाडला २०१९ ला जिंकेलेल्या जागांवर त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहणार असल्याबाबत युतीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहितीही दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सातारा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढविण्यासाठी तयार झाली आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी केली असलीतरी महायुतीत जागा वाटपाचा फैसला झालेला नाही. त्यामुळे मतदारसंघ कोणाकडे जाणार हे स्पष्ट नाही. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी सातारा जिल्हा दाैऱ्यावर होते. कऱ्हाड तालुक्यातील कार्यक्रम करुन ते रात्री साडे दहाला साताऱ्यात आले. त्यानंतर त्यांनी कोअर कमिटीची बैठक घेतली.
साताऱ्यातील एका हाॅटेलमधील बैठकीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस विक्रांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, लोकसभा संयोजक सुनील काटकर, महिला जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सुवर्णा पाटील, प्रिया शिंदे, चिन्मय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे, अशी सूचनाही केली. तर सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. तरीही तुमच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनातही आहे. यासाठी तुमच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहाेचवू, असेही आश्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. तर या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मुंबईकडे रवाना झाले.
साताऱ्याचा तिढा दिल्लीत सुटणार..
सातारा मतदारसंघ भाजपला मिळाल्यास खासदार उदयनराजे भोसले हेच उमेदवार असणार आहेत. तसेच त्यांचे कार्यकर्तेही भाजपलाच मतदारसंघ सुटणार असल्याचा ठाम दावा करत आहेत. पण, भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या यादीत साताऱ्याचा उमेदवार जाहीर केलाच नाही. त्यामुळे साताऱ्याच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झालेले आहे. हा तिढा आता दिल्लीतील चर्चेतच सुटू शकतो, अशी चर्चा आहे.
कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह..
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सर्व सदस्यांची वैयक्तीक मत जाणून घेतले. त्यावेळी सर्वांनीच सातारा लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढविण्याचा आग्रह धरला अशी माहितीही मिळत आहे.