कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला
By नितीन काळेल | Published: August 3, 2024 07:26 PM2024-08-03T19:26:13+5:302024-08-03T19:28:13+5:30
ठाकरेंचे वक्तव्य वैफल्यातून..
सातारा : राजकीय स्वास्थासाठी फेक नरेटीव्ह पसरिवण्याचा विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा समोर आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच न लागल्याने त्यांनी शेरेबाजी सुरू केली आहे. पण, याला भाजपने चोख उत्तर दिल्याने विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयीचे अज्ञान उघड पडले आहे, असा टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी लगावला. तसेच फडणवीस यांना आव्हान दिल्याबद्दल ‘कोरोनात घरात बसून दिवस काढले. तसेच आताही काढावे लागतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांना दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सर्वांच्या गरजा, अपेक्षा लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. यातून महाराष्ट्राला भरघोस तरतूद झालेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकासासाठी ४०० कोटी दिले आहेत. महाराष्ट्र-गुजरात-मध्यप्रदेश- हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-दिल्ली आैद्योगिक काॅरिडाॅरसाठी ४९९ कोटी तर बंगळूरू-मुंबई काॅरिडाॅरसाठी ४६६ कोटींची तरतूद आहे. मुंबई, पुणे येथील मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार ५८४ कोटींची तरतूद आहे. राज्यात ७६ हजार कोटींचा वाढवण बंदर प्रकल्प होतोय. दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. बिहार आणि आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात तरतूद केली त्यापेक्षा या प्रकल्पाची किंमत अधिक आहे.
विराेधक हे केंद्रीय अर्थसंकल्पातून काही मिळाले नसल्याचे शेरेबाजी करतात. पण, त्यांना अऱ्थसंकल्पाचे ज्ञान कमीच आहे. मुख्यमंत्रिपदावर असातना उध्दव ठाकरे यांनी आपल्याला अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशी जाहीर कबुली दिली होती. त्यांचेही ज्ञान आता उघड झाले असून अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यास पुस्तकाच्या प्रती मोफत वितरित करु, असेही भंडारी यांनी जाहीर केले.
ठाकरेंचे वक्तव्य वैफल्यातून..
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिले आहे, याविषयी पत्रकारांनी प्रश्न केला. यावर माधव भंडारी यांनी ठाकरे यांचे हे वक्तव्य वैफल्य आणि नैराश्येतून आहे. महाराष्ट्रातील जनता एकेरी भाषा सहन करत नाही. शिशुपालने श्रीकृष्णालाही असेच सांगितले होते. यामध्ये पुढे काय झाले सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कोरोनात जसे घरात बसून दिवस काढले. तसेच यापुढे दिवस काढावे लागतील, असा इशारा दिला.