‘भाजप’तील ‘गोंधळ’, कराडकरांच्या ‘नजरा’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:03+5:302021-03-14T04:34:03+5:30

प्रमोद सुकरे : कराड : कराड पालिकेत सध्या सत्ताधारी भाजप व जनशक्ती आघाडीत बराच गोंधळ सुरू आहे. खालच्या ...

BJP's 'confusion', Karadkar's 'eyes'! | ‘भाजप’तील ‘गोंधळ’, कराडकरांच्या ‘नजरा’ !

‘भाजप’तील ‘गोंधळ’, कराडकरांच्या ‘नजरा’ !

Next

प्रमोद सुकरे :

कराड : कराड पालिकेत सध्या सत्ताधारी भाजप व जनशक्ती आघाडीत बराच गोंधळ सुरू आहे. खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. म्हटले तर हे सगळेच भाजपशी संबंधित आहेत. वर्षभरावर पालिका निवडणूक येऊन ठेपली असताना सुरू असणाऱ्या या ‘गोंधळात गोंधळावर’ कराडकर ‘नजरा’ ठेवून आहेत याचे भान मात्र कोणालाच दिसत नाही.

सुमारे चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीत भाजपच्या रोहिणी शिंदे थेट जनतेतून नगराध्यक्ष झाल्या. बहुमत ''जनशक्ती'' आघाडीला मिळाले, तर ''लोकशाही'' आघाडीला विरोधी बाकावर बसण्याचा कौल मिळाला. त्यामुळे कराडकर सत्तेची ‘सर्कस’ बघत बसले आहेत. सत्ता संपत आली तरीही पालिकेत नेमके सत्ताधारी कोण? हे कळणे अवघड झाले आहे. सध्या तर ‘सत्तेचं त्रागंड’ या नाटकाचा शेवटचा अंक सुरू आहे असेच म्हणावे लागेल.

नगराध्यक्ष या भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थक आहेत; तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांचा शहरात स्वतंत्र गट आहे. भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने नगराध्यक्षांनी बहुमत असलेल्या ''जनशक्ती''शी जुळवून घेतले. जनशक्तीतूनही भोसले समर्थक असणारे जयवंत पाटील उपनगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष शहराचा कारभार करू लागले, पण नगरसेवक पावसकर दूर राहात गेले. मग भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात अंतर पडत गेले.

मध्यंतरीच्या काळात नगराध्यक्ष शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला. यावेळी बहुसंख्य जनशक्ती मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर राहिली. मग नगराध्यक्ष व भाजप नगरसेवकांच्यात ‘मिले सुरू मेरा तुम्हारा ..’ सुरू झाले. ज्येष्ठ नगरसेवक पावसकर व नगराध्यक्ष एकत्रित काम करू लागले. दरम्यान, गतवर्षी नगराध्यक्षांचे आकाडीला एक जेवन झाले म्हणे...त्याला उपनगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक उपस्थित होते. मात्र राजेंद्र यादव तेथे नव्हते. तेव्हाच जनशक्तीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. राजेंद्र यादव व नगराध्यक्ष यांच्यात तेव्हापासून मतभेद सुरू झाले ते आता टोकाला चाललेले दिसतात.

काही दिवसांपूर्वी पालिकेत अर्थसंकल्पीय बैठक झाली. भाजप नगरसेवकांनी सूचना वाचली, विरोधी ‘लोकशाही’च्या सौरभ पाटील यांनी त्यावर टीका करीत प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तरे कोणी द्यायची यावरून सत्ताधारी भाजप व जनशक्तीत ''तू-तू-मै-मै'' सुरू झाले. सूचना वाचणारेच उत्तर देतील असा जनशक्ती ने पवित्रा घेतला. त्यानंतर सूचना फेटाळत जनशक्तीने उपसूचना मांडल्या. सूचना की उपसूचना मंजूर यावरून गदारोळ झाला. आज कराडचा अर्थसंकल्प कायद्याच्या कचाट्यात सापडला असून, दोन स्वतंत्र अर्थसंकल्प जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात मंजुरीसाठी पडून आहेत.

त्यानंतर नगराध्यक्ष शिंदे व नगरसेवक पावस्कर यांनी पत्रकार परिषदेत जनशक्तीचा समाचार घेतला. ‘स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच जनशक्ती ने गदारोळ केला’ असा आरोप केला. ‘अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा होते, मग तो विशेष सभेत येतो; तेथे तुमचे बहुमत आहे. मग येथे गदारोळ कशासाठी? ''असा सवालही उपस्थित केला. तर ''पालकमंत्र्यांचे बालक आत्ता कसे जागे झाले'' असे सौरभ पाटील यांनाही सुनावले.

आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व जनशक्तीने गटनेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत ‘नगराध्यक्षांनी कराडच्या विकासाचा खेळखंडोबा केला आहे; त्यांचे व चौकडीचे फक्त टक्केवारीवर लक्ष असते; नगराध्यक्ष तर नळावरील भांडणाप्रमाणे वागतात’ असा टोला लगावला. पुन्हा त्याला उत्तर देण्यासाठी पावसकरांनी पत्रकार परिषद घेतली; ‘ज्यांना कष्टच माहीत नाहीत, ज्यांचा व्यवसायच टक्केवारी आहे; अशा नापास झालेल्यांनी दुसऱ्याची मापे काढू नयेत’ असे यादवांना सुनावले. नैतिकता हा शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही, असेही ते म्हणाले.

आता गेले काही दिवस सुरू असणाऱ्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशाच सुरू राहणार ही थांबणार हे निश्चित सांगता येत नाही. पण ‘भाजप’मधील लोकांच्या सुरू असणाऱ्या या ‘गोंधळात गोंधळावर’ कराडकरांच्या ‘नजरा’ नक्कीच आहेत. खरंतर याचे भान जबाबदार लोकांनी ठेवायला हवे. कारण, वर्षभरानंतर तुम्हालाच परत कराडकरांच्या दारात जायचं आहे बरं..!

चौकट :

उपनगराध्यक्ष स्तब्ध..

सत्ताधारी असणाऱ्या भाजपाच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे व त्यांचा चमू; तसेच बहुमतातील जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव व सहकारी यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र सत्तेत असणारे त्यांचेच उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व त्यांचे सहकारी स्तब्ध दिसत आहेत. या सगळ्या घडामोडीत त्यांनी ''ब्र'' शब्दही तोंडातून काढलेला दिसत नाही.

चौकट :

‘लोकशाही’ चतुर ..

एका पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष शिंदे व नगरसेवक पावसकर यांनी लोकशाही आघाडी व गटनेते सौरभ पाटील यांच्यावरही टीका केली. पण या टीकेला पाटील उत्तर देत बसले नाहीत. उलट त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी चतुराई दाखवून दिल्याची चर्चा शहरात आहे.

फोटो :

13रोहिणी शिंदे 1

13विनायक पावसकर 2

13 राजेंद्र यादव 3

Web Title: BJP's 'confusion', Karadkar's 'eyes'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.