भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:30 PM2019-09-10T13:30:52+5:302019-09-10T13:32:52+5:30
भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
कऱ्हाड : भाजपकडून पक्षांसह त्यांच्या नेत्यांवर चौकशीची टांगती तलवार ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस तिहार जेलची क्षमता वाढवल्याचे सांगतात. याचा अर्थ आम्ही आवाज उठवला, चुका दाखवल्या, जनतेची बाजू घेऊन कोणी बोलले तर त्यांना जेलमध्ये टाकू, असाच आहे. त्यामुळे भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, संघटक बाळकृष्ण देसाई, महेशकुमार कचरे, भालचंद्र माळी, सचिन करांडे, अॅड. विश्वास मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सावंत आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर म्हणाले, आज देशात खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. देश प्रचंड मंदीतून चालला आहे. अगोदरच कापसाला भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. कापसानंतर आता सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला आहे. अनेक मोठ्या कंपन्या आपले कर्मचारी कामावरून कमी करू लागले आहेत.
आज देशात भाजप सरकार विरोधात सत्तेत विरोधी पक्ष उरलेला नाही. जे पक्ष विरोधात आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी त्यांच्यातील लोकांपुढे भाजपने दोन पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे देशात आमची सत्ता येऊ द्या आणि दुसरा तिहार जेल तुमच्यासाठी खुले आहे.ह्ण
काँग्रेसला दीड पायाचा पॅरालेसिस झालाय
आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीला निवडणुकीतील जागाबाबत बोलणी केली होती. मात्र ते आमच्याशी युती करायला तयार नसल्याचे दिसतात. त्यामुळे आम्ही आता या दोन्ही पक्षांबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादीतील काहीजण पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेसला दीड पायाचा पॅरालेसिस झाला असल्याची टीका डॉ. आंबेडकर यांनी केली.