भाजप पदाधिकाऱ्याचा खून
By admin | Published: May 14, 2016 12:30 AM2016-05-14T00:30:33+5:302016-05-14T00:38:20+5:30
गोवारेत शोककळा : पूर्ववैमनस्यातून कृत्य; तिघांवर गुन्हा; एकास अटक
कऱ्हाड : गोवारे येथील माजी सरपंच व ‘भाजप’चे कऱ्हाड दक्षिण सरचिटणीस बशीर शिराजउद्दीन इनामदार (वय ५८, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. चौंडेश्वरीनगर येथील कृष्णा कालव्यात शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. या खून प्रकरणात तिघांची नावे निष्पन्न झाली असून, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासांतून समोर येत आहे.
विकास आकाराम जाधव, राहुल बबन जाधव (दोघेही, रा. चौंडेश्वरीनगर, गोवारे) व अनिल बाबासाहेब मोरे (मूळ रा. खटाव, सध्या रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील राहुल जाधव व अनिल मोरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या खुनानंतर शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवारे येथील बशीर इनामदार हे माजी सरपंच होते. तसेच सध्या ‘भाजप’चे कऱ्हाड दक्षिणचे सरचिटणीसपदही त्यांच्याकडे होते. इनामदार कुटुंबीय सध्या शहरानजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत वास्तव्यास आहेत. बशीर यांचा मुलगा कैस हा बेकरी व्यावसायिक असून, वडील बशीर हेसुद्धा त्याला या व्यवसायात मदत करीत होते. गुरुवारी सायंकाळी बशीर हे अचानक घरातून बेपत्ता झाले. घरात कोणास काहीही न सांगता ते निघून गेले. तसेच रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सकाळपर्यंत शोध घेऊनही ते न सापडल्याने मुलगा कैस याने याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनीही बशीर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना बशीर हे गुरुवारी सायंकाळी काही युवकांसोबत गेल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी गोवारेतील राहुल जाधव या युवकाकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने साथीदारांसमवेत संगनमत करून बशीर यांचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
गोवारे येथील विकास जाधव व बशीर यांच्यात पूर्वी वाद झाला होता. या वादाच्या कारणावरून विकास त्यांच्यावर चिडून होता. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विकासने बशीर यांना घरातून बाहेर बोलावून घेतले. तसेच तो त्यांना घेऊन गोवारे गावच्या हद्दीतील चौंडेश्वरीनगर येथे कृष्णा कालव्याच्या पुलावर गेला. त्या ठिकाणी त्याने त्यांच्याशी वाद घातला. या वादावादी दरम्यान विकास, राहुल व अनिल या तिघांनी बशीर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. लाकडी दांडक्यानेही मारहाण करण्यात आली. त्यानंतर या तिघांनी त्यांना उचलून कालव्यामध्ये फेकून दिले. त्यामध्येच बशीर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासांतून समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी राहुल जाधव व अनिल मोरे या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे, तर विकास याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दुचाकी हस्तगत
घरातून जाताना बशीर हे त्यांची दुचाकी (एमएच ५० जी १५१६) घेऊन गेले होते. संशयितांनी मारहाण करून खून केल्यानंतर बशीर यांची दुचाकी त्याच ठिकाणी टाकून दिली होती. पोलिसांनी ती घटनास्थळावरून जप्त केली आहे.
पूर्ववैमनस्य की आणखी काही..?
बशीर हे गोवारेचे माजी सरपंच होते. तसेच सध्या त्यांच्याकडे भाजपचे कऱ्हाड दक्षिण सरचिटणीस हे पद होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून हा खून पूर्ववैमनस्याच्या कारणावरून झाल्याचे समोर येत आहे. मात्र, खुनामागे अन्य काही पार्श्वभूमी आहे का? याचाही पोलिसांना कसून तपास करावा लागणार आहे.