भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ने देशाचा आत्मा घालविला : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 06:03 AM2023-05-10T06:03:12+5:302023-05-10T06:03:44+5:30
धर्मनिरपेक्ष देश ही ओळख धोक्यात, देशात जातिभेदही वाढला
सातारा : ‘सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा देशाचा आत्मा आहे. ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे देशात जातिभेद वाढला असून, त्यातून तणावाची परिस्थितीही उद्भवत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘धार्मिक तेढ निर्माण करून परस्परांना भिडविण्याचे पाप भाजपने केले आहे. काहीही करून सत्ता मिळवणे आणि ती मिळत नसेल तर सत्ता संघर्ष वाढवणे, ही भाजपची धोकादायक नीती झाली आहे. या नीतीचे प्रयोग देशभर सुरू असून, याद्वारे तेढ निर्माण होत आहे.’
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा घेणार, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दावा
पवारांच्या शब्दाला देशात आणि राज्यात मान आहे; पण त्यांना पक्षात वारस तयार करता आला नाही, या टीकेवर पवार म्हणाले, ‘आम्ही काय केलं ते त्यांना माहीत नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की पक्षाचे सर्व सहकारी अनेक गोष्टी परस्परांशी बोलतो, त्यावर मतमतांतरेही असतात; पण त्याची बाहेर जाऊन प्रसिद्धी कधीही करत नाही. हा आमच्या पक्षाचा, कुटुंबाचा प्रश्न असतो. नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार होते, याची काळजी पक्षाच्या सदस्यांना आहे. त्यांनी जे काही लिहिलं त्याचे महत्त्व आमच्या दृष्टीने काहीही नाही. लिहिणं त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी बजावला आहे. आम्ही काय करतो हे आम्हाला माहीत आहे, त्याची चिंता करू नये.’
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, वडीलकीच्या नात्याने पवारांना बोलण्याचा अधिकार
शरद पवार मोठे नेते आहेत. वडीलकीच्या नात्याने त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. कर्नाटकमध्ये प्रचारात समोर विरोधी उमेदवार असल्याने मी बोललो. पण, यापुढे मी बोलणार नाही, असे स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत दिले आहे. या वादाचे पडसाद महाविकास आघाडीवर होणार नाहीत, भाजप विरोधातील आघाडी मजबूत होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील, ते माहीत नाही. राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असून, भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू असल्याचा गाैप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावर पवार म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांचे त्यांच्याच पक्षात काय स्थान आहे? ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी तपासावे. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहे? ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे सांगणार नाहीत.