पृथ्वीराज चव्हाणांसमोर भाजपचे तगडे आव्हान; पण तिरंगी लढतीवर अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:43 AM2019-09-15T05:43:03+5:302019-09-15T05:43:18+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील निवडणुकीत तिरंगी लढतीत बाजी मारली असली तरी यावेळी भाजपकडून जोरदार लढत दिली जाण्याची शक्यता आहे.
- दीपक शिंदे
सातारा : क-हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील निवडणुकीत तिरंगी लढतीत बाजी मारली असली तरी यावेळी भाजपकडून जोरदार लढत दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे अतुल भोसले यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिल्यामुळे चव्हाण मतदारसंघातच अडकून पडण्याची शक्यता आहे.
कºहाड दक्षिण मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. मलकापूर नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. गत निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या अतुल भोसले यांना पंढरपूर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड करून राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विकासकामांसाठी निधी देऊन गेल्या पाच वर्षांपासून सतत ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मतदारसंघात त्यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्याबरोबरच आत्तापर्यंत काँग्रेस पक्षासोबत असलेले विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही यावेळी लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच त्यांनी मलकापूर नगरपालिका निवडणुकीत काम केले आहे. त्यामुळे यावेळी विधानसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी थांबून काँग्रेसकडून आपल्याला संधी द्यावी, अशी
त्यांची अपेक्षा आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी केली आहे; पण, पृथ्वीराज चव्हाण काय निर्णय घेतात? यावर उंडाळकर यांना संधी मिळणार का? हे अवलंबून असेल.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तरी ते अपक्ष म्हणून लढृू शकतात.
>पाच वर्षांत काय घडले?
मलकापूर नगरपालिका ही आपल्या ताब्यात असावी, यासाठी अतुल भोसले यांनी खूप प्रयत्न केले; पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेललाच या नगरपालिकेत यश मिळाले.
पंचायत समिती उंडाळकर, बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात होती. ती अतुल भोसले यांनी घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
शेती उत्पन्न बाजार समिती पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडे होती. ती उंडाळकरांनी पूर्ववत त्यांच्या ताब्यात घेतली.
कºहाड जिल्हा करण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नवी कार्यालये सुरू केली; पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
>निवडणूक २०१४
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
७६,८३१ मते
विलासराव पाटील (अपक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत)
६०,४१३ मते
अतुल भोसले (भाजप)
५८,६२१ मते
>संभाव्य प्रतिस्पर्धी
अतुल भोसले - भाजप
उदयसिंह पाटील - अपक्ष
>मुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या संधीचे राज्यासह मतदारसंघाच्या विकास कामांकडे लक्ष दिले. अनेक सरकारी कार्यालये उभारली. अनेक प्रश्न मार्गी लावले. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी केली. लाखो युवकांना बेरोजगार केले.
- पृथ्वीराज चव्हाण,
माजी मुख्यमंत्री