राष्ट्रवादी फोडूनही भाजपच्या मतांची बेरीज जुळत नाही; साताऱ्यातून जयंत पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 07:21 PM2024-02-05T19:21:39+5:302024-02-05T19:21:57+5:30
जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.
NCP Jayant Patil ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात ‘राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावे’ घेण्यात येणार आहेत. साताऱ्यातून आजपासून या मेळाव्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच मेळाव्यात जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. "आज महाराष्ट्रातील लहान मुलालाही कळत आहे की लोक पक्ष सोडून का जात आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची मतांची बेरीज होत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. महाविकास आघाडीची मते आजही अनेक मतदारसंघात अधिक आहेत. रामराज्य व्हावं हे सामान्य माणसाच्या मनामध्ये होते ते आहे का? याचा विचार करायला पाहिजे. आदरणीय शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून त्यांची अडचण होते," असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला आहे.
विजय निश्चय मेळाव्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार आहोत, त्या सर्व ठिकाणांचा दौरा आज मी पाटणपासून सुरू केलेला आहे. आपल्यापुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपला पक्ष फुटून आपले काही सहकारी सत्तेत सहभागी झाले आहेत, या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती होती, ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली होती. पण आज महाराष्ट्राची संस्कृती बिघडलेली आहे आणि लोकांना फोडाफोडी करून सत्तेत जाण्याचा मोह हा काही कमी होताना दिसत नाही. सत्ता व पैसा याचा एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तयार केलेले आहे," अशी टीका पाटील यांनी केली आहे.
उल्हासनगरमधील गोळीबारावरून सरकारला घेरलं!
उल्हासनगर इथं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे. जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करत म्हटलं की, "आज व्यवसायिक व्यवसाय करतात हे समजू शकतो पण आता आमदारही व्यवसायिक झालेले आहेत, ते सुद्धा जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरा घुसला तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो व सकाळी बातमी येते की ज्यांनी गोळीबार केले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेले आहे. महाराष्ट्रातच नाही तर बिहारमध्ये देखील पोलीस स्टेशनमध्ये कधी गोळीबार झाला असेल, असे मला वाटत नाही. आपण म्हणायचो की कुठे नेलाय महाराष्ट्र? महाराष्ट्राचा काय बिहार करणार आहेत का? आता ते वाक्य रद्द करा महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे. बिहारचा महाराष्ट्र झालाय, त्यांची सुधारणा झाली आहे. पण आमची अधोगती एवढी झाली आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, पण यांना राज्य आवरत नाही अशी यांची परिस्थिती आहे. राज्य करणार्यांचा लोकांवर, कार्यकर्त्यांवर व सत्तेत असलेल्या आमदारांवर कोणताही प्रभाव नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे."
कार्यकर्त्यांना आवाहन
निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी साताऱ्यातील मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. "येणारा काळ हा आपल्या सर्वांच्या परीक्षेचा आहे, या परीक्षेला आपण सर्वांनी उतरले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून सत्यजीत पाटणकर यांच्या पाठीशी कायम उभे राहायचे आहे. लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झाले पाहिजे, आपण सर्वांनी सक्षमपणाने पक्षाचे काम सुरू केले पाहिजे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे विक्रम सिंह पाटील, सत्यजित पाटणकर व आपल्या खासदार साहेबांना साथ देण्याचे काम करावे अशी विनंती करतो," असं जयंत पाटील म्हणाले.