शशिकांत शिंदेंच्या हुमगावात भाजपची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:45+5:302021-01-19T04:40:45+5:30
मेढा : जावळी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये कुडाळ ग्रामपंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. आता ...
मेढा : जावळी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये कुडाळ ग्रामपंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. आता सरपंच आरक्षणासाठी कोणत्या प्रवर्गाची वर्णी लागणार, याकडेच लक्ष वेधले आहे. तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगावमध्ये भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ यांनी बाजी मारली.
जावळी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या ५४५ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ३३९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामुळे ७२ प्रभागांतून २४२ उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातील कुडाळ, सरताळे, बामणोली तर्फ कुडाळ, बेलावडे, रायगाव, महिगाव येथे निवडणूक चुरशीची झाली होती. यात कुडाळमध्ये उपसभापती सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनेलला सात जागा, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या समर्थ पॅनेलला चार जागा, तर हेमंत शिंदे यांच्या कुडाळ बहुजन विकास आघाडीने ४ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे कोणत्याही पॅनेलला बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
बेलावडेत मोठी चुरस पाहायला मिळाली. तेथे पारंपरिक सुदाम शिंदे विरुद्ध बापूराव गायकवाड यांच्या दोन गटातच लढत झाली होती. यामध्ये बापूराव गायकवाड गटाने सर्व सात जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. सर्जापूरमध्ये सावतामाळी वॉर्डमधून देविदास बोराटे, सिद्धेश्वर वाॅर्डमधून शंकर मोहिते, सुरेखा मोहिते आणि लोकमान्य टिळक वाॅर्डमधून मयूर बाबर विजयी झाले आहेत. सरताळेत साने गुरुजी वाॅर्डमधून निशांत नवले, नेहरू वाॅर्डमधून दिनेश गायकवाड, बारीकराव कदम आणि वैराटेश्वर वाॅर्डमधून सुनील धुमाळ, सारिका गुठाळे निवडून आले आहेत.
बामणोली तर्फ कुडाळ याठिकाणी पारंपरिक दोन गट एकत्र येत विजय संपादन केला आहे. यामुळे प्रशांत तरडे यांच्या गटाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. रायगावमध्ये ग्रामविकास पॅनेलचे समाधान गायकवाड, ज्योत्स्ना निकम, राजश्री दुटाळ, हसीना शेख व शैलेश बगाडे विजयी झाले आहेत. दीपक पवार यांच्या पवारवाडीत पाचही जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. केवळ दोन बिनविरोध जागा त्यांना मिळाल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगावात भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ यांनी बाजी मारली आहे. खामकरवाडी येथे आजीबाईंनी एकाकी झुंज देऊन फक्त एक मताने विजय खेचून आणला. अंधारी-कासमध्ये रवींद्र शेलार, संतोष शेलार, सुरेखा शेलार, तर विरोधी गटाच्या कांचन किर्दत व लीला सुर्वे विजयी झाल्या आहेत.
चौकट :
या ग्रामपंचायती बिनविरोध....
धनकवडी, पिंपरी तर्फ मेढा, करंडी तर्फ मेढा, करंजे, केंजळ, केसकरवाडी, केडंबे, बोंडारवाडी, भूतेघर, आंबेघर तर्फ मेढा, डांगरेघर, मोहाट, म्हाते बुद्रुक, मुकवली, रेंगडेवाडी, वरोशी, गवडी, चोरांबे, दिवदेव, मामुर्डी, आखेगणी, आंबेघर तर्फ कुडाळ, महू, रांजणी, दापवडी, बेलोशी, खर्शी तर्फ कुडाळ, आर्डे, आपटी, कसबे बामणोली, कारगाव, मुनावळे, शेंबडी, उंबरेवाडी, इंदवली तर्फ कुडाळ, करंदी तर्फ कुडाळ, शेते या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.