सांगली-साताऱ्यातून भाजपची माघार

By admin | Published: November 5, 2016 11:53 PM2016-11-05T23:53:22+5:302016-11-06T00:28:05+5:30

विधान परिषद निवडणूक : कॉँग्रेस बंडखोराचा अर्ज कायम; मुख्य लढत मोहनराव कदम व शेखर गोरे यांच्यातच

BJP's withdrawal from Sangli-Satara | सांगली-साताऱ्यातून भाजपची माघार

सांगली-साताऱ्यातून भाजपची माघार

Next

सांगली : विधानपरिषद निवडणुकीत शनिवारी काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्या थेट लढतीवर शिक्कामोर्तब होत असताना काँग्रेसमधील विशाल पाटील गटाचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी माघारीचे नाट्य घडवून रिंगणात अर्ज कायम ठेवला. दुसरीकडे भाजपने कमी संख्याबळाचे कारण सांगत मैदानातून माघार घेतली. कदम-दादा गटातील वाद संपुष्टात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली शिष्टाई असफल ठरल्याने तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत.
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या गटाने महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक शेखर माने यांचा अर्ज दाखल केला. अधिकृत उमेदवार निश्चित झाल्यानंतरही माने यांचा अर्ज तसाच ठेवण्यात आला. अर्ज माघारीची अंतिम मुदत शनिवारी दुपारी तीनपर्यंत होती. त्यामुळे सकाळी अकरापासून बंडखोर गटाला शांत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दूत म्हणून
आलेले आमदार आनंदराव पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांची शिष्टाई कामी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती चव्हाण यांना देण्यात आली. चव्हाण यांनी दूरध्वनीवरून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसअंतर्गत वाद निर्माण होणे पक्षाच्या हिताचे नाही. त्यामुळे पक्षीय आदेश म्हणून अर्ज मागे घ्यावा, असे चव्हाण यांनी त्यांना सांगितले. पाटील यांनीही अर्ज मागे घेण्याचे मान्य केले. त्यानंतर माघार नाट्यास सुरुवात झाली.
शेखर माने अर्ज मागे घेणार म्हणून कदम गट तसेच अन्य काँग्रेस नेत्यांचा जीव भांड्यात पडला. दुपारी अडीचला बैठक संपल्यानंतर माने यांना अर्ज मागे घेण्याची सूचना देण्यात आली. मात्र त्यांनी माघारीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे ३ वाजून २ मिनिटांनी सादर केला! गायकवाड यांनी माघारीची मुदत संपल्याचे स्पष्ट करून अर्ज स्वीकारला नाही. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माने यांनी निवडणूक लढवायची की पाठिंबा द्यायचा, याबाबत पुनर्विचार सुरू असल्याचे स्पष्ट करून संभ्रम निर्माण केला. काँग्रेसमधील बंडखोरी कायम राहिल्याने पक्षांतर्गत चिंता वाढली आहे.
दुसरीकडे भाजपने कमी संख्याबळाचे कारण सांगत माघार घेतली. निवडणूक रिंगणात आता काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे शेखर गोरे, काँग्रेसचे बंडखोर शेखर माने आणि अपक्ष मोहनराव गुलाबराव कदम यांचे अर्ज राहिले आहेत. (प्रतिनिधी)

माझा पाठिंबा, मानेंची नाराजी
पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाचा आदर करून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेखर माने यांची अजूनही नाराजी आहे. ती स्वाभाविक आहे. अधिकृत उमेदवार म्हणून मोहनराव कदम यांच्याबरोबर असलो, तरी माने यांची नाराजी दूर करावी लागेल. माने यांची बंडखोरी नाही. अजूनही मतदानाला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही माने यांची नाराजी दूर करू शकतो.

राजकारणात भाऊबंदकी असते!
कदम गटाला शह म्हणून माने यांनी अर्ज दाखल केलेला नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असू शकतात. भाऊबंदकीसुद्धा असते. मी चुलत भावाच्या विरोधात लढलो आहे. त्यामुळे राजकारणात या गोष्टी नव्या नाहीत. तरीही पक्षाच्या विरोधात जाऊन राजकारण कधीही केलेले नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही ते होणार नाही, असे विशाल पाटील म्हणाले.

वाद मिटलेला आहे...
आमदार आनंदराव पाटील म्हणाले की, पक्षांतर्गत वाद आता संपुष्टात आला आहे. शेखर माने यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणाने राहिला आहे. लवकरच ते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या बाजूने भूमिका स्पष्ट करतील, याची खात्री आहे. बंडखोरीचा प्रश्न उरलेला नाही. कॉँग्रेस एकसंधपणेच ही निवडणूक लढवेल. राष्ट्रवादीतच अधिक मतभेद आहेत. त्याचा फायदा कॉँग्रेसला मिळणार आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या : १८
असे आहे मतदान
एकूण मतदान ५७०
सातारा ३०४
सांगली २६६
महिला २८४
पुरुष २८६


रिंगणातील उमेदवार
मोहनराव श्रीपती कदम (काँग्रेस), मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष), शेखर भगवानराव गोरे (राष्ट्रवादी), शेखर माने (काँग्रेस बंडखोर)
माघार घेतलेले उमेदवार
आ. प्रभाकर घार्गे (अपक्ष), अरुण लाड (अपक्ष), किशोर धुमाळ (अपक्ष), युवराज बावडेकर (भाजप)

दुसरे मोहनराव कदम
कोरेगाव तालुक्यातील
सातारा : विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून शेवटपर्यंत टिकून राहिलेले मोहनराव गुलाबराव कदम हे कोरेगाव तालुक्यातील देऊरचे आहेत. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव श्रीपतराव कदम यांच्या नावाशी साधर्म्य असणारे देऊरचे कदम शिक्षक असून, अर्ज भरल्यापासून गावात कुणाला दिसलेच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच त्यांच्या मोबाईलवरही संपर्क होऊ शकत नाही.
दरम्यान, त्यांनी सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचेही गावात कुणाला ठाऊक नव्हते. त्यांचा शोध घेत परजिल्ह्यातील कार्यकर्ते, नेते गावात आल्यानंतर मात्र हे उमेदवार असल्याचा साक्षात्कार गावकऱ्यांना झाला.

Web Title: BJP's withdrawal from Sangli-Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.