ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीत भरले काचेने रंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:31+5:302021-03-14T04:34:31+5:30
सातारा : दृक्श्राव्य माध्यमात क्रांती झाली अन् झोपडीतही टीव्ही दिसायला लागला; पण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी रंगीत टीव्ही खूप महागडा वाटायचा. ...
सातारा : दृक्श्राव्य माध्यमात क्रांती झाली अन् झोपडीतही टीव्ही दिसायला लागला; पण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी रंगीत टीव्ही खूप महागडा वाटायचा. त्यामुळे गावातील धनिकांच्या घरातच तो पाहायला मिळायचा. पण मुलांचा आग्रह, आपलाही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही रंगीतच हवा, असा असायचा अन् एका काचेने ही समस्या दूर केली. कृष्णधवल टीव्ही स्क्रीनवर लावण्यासाठी काच मिळू लागली. ती चार रंगांची असल्याने, ती लावली की गरिबांचा टीव्ही पण रंगीत दिसत होता. हे काम अवघ्या तीस-चाळीस रुपयांत होत असे.
पंचवीस वर्षांपूर्वी गावोगावी दुर्मीळ असणाऱ्या लाकडी कपाटाच्या टीव्हीची बाजारात किरकोळ किंमत होती. ग्रामीण भागासह शहरी भागात पंचवीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यासाठी साध्या लाकडी कपाटाच्या टीव्हीचा वापर होत होता. त्या गावातील एखाद्या व्यक्तीच्या घरी तोच टीव्ही असायचा .सायंकाळी टीव्ही पाहण्यासाठी संपूर्ण गाव गोळा होत होता आणि गावात ग्रामपंचायतीने टीव्ही खरेदी केले होते. दररोज सायंकाळी बातम्यांसाठी टीव्ही लावला जात होता. कालांतराने नवीन तंत्रज्ञान आले, टीव्हीमध्ये अनेक बदल झाले.
ज्या लोकांना टीव्हीला काच लावणे शक्य नव्हते, असे लोक अगदी एक-दोन रुपयांत बाजारात मिळणारा जिलेटिनचा रंगीत कागद टीव्हीच्या काचेला चिकटवून कलर टीव्हीचा आनंद घेत होते. लाल, निळा, पिवळा, हिरवा अशा रंगांचे जिलेटिनचे कागद पूर्वी भेटवस्तूच्या सजावटीसाठी वापरले जात होते. हे कागदही नव्वदीच्या दशकात अनेकांना आनंद देऊन गेले.
दरम्यानच्या काळात बहुतांशजणांच्या घरात कलर टीव्ही आले. मात्र, गरिबांच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच होते. आपल्याही घरात कलर टीव्ही असायला हवा, असे अनेकांना वाटत असे. पण त्यावर शोध लागला. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर दिसण्यासाठी बाजारात मल्टिकलरच्या काचा आल्या. ती काच ब्लॅक अँड टीव्हीसमोर लावली की, टीव्ही रंगीत दिसू लागला. तसेच काहीजण डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून निळ्या रंगाची काच वापरायचे.
चौकट..
धूळ जाऊ नये म्हणून प्लास्टिकच्या कव्हरचा वापर...
ग्रामीण भागात फारशा लोकांच्या घरात टीव्ही नव्हते. मात्र, ज्यांच्या घरात टीव्ही असायचा, ते लोक त्याला खूप जपायचे. काहींच्या घरात लाकडी शटरचे टीव्ही असायचे. मालिका, सिनेमा पाहून झाल्यानंतर टीव्हीचे शटर बंद करून ठेवायचे; कारण त्यामध्ये धूळ, कचरा जाऊ नये म्हणून. त्याची खूप काळजी घेतली जायची. ज्यांच्याकडे शटरचा टीव्ही नव्हता, असे लोक टीव्हीवर झाकण्यासाठी कापडी किंवा प्लास्टिकच्या कव्हरचा वापर करू लागले. त्या कव्हरला दोन्ही बाजूला चेन असायची. त्यामुळे टीव्हीच्या स्क्रीनवर धूळ बसत नसे.
फोटो..
13टीव्ही01/02