डोंगरची काळी मैना अडकली लॉकडाऊनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:20+5:302021-05-21T04:41:20+5:30
पिंपोडे बुद्रुक : सर्वदूर परिचित असलेली करवंदे म्हणजेच डोंगरची काळी मैना उत्तर कोरेगाव भागातील चवनेश्वर, सर्कलवाडी आणि सोळशी डोंगरदऱ्यात ...
पिंपोडे बुद्रुक : सर्वदूर परिचित असलेली करवंदे म्हणजेच डोंगरची काळी मैना उत्तर कोरेगाव भागातील चवनेश्वर, सर्कलवाडी आणि सोळशी डोंगरदऱ्यात बहरून आली आहेत. चैत्र महिन्यापासून या आंबटगोड काटेरी करवंदांच्या जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंदे घडेघड लगडतात. मात्र, लाॅकडाऊन असल्याने शेतकरी ते घेऊन शहरात येऊ शकत नाहीत.
पिकल्यावर त्याचा रंग काळा होतो. स्थानिक लोक रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात. काही काळापूर्वी ही करवंदे पाच रुपयांना छोटे माप व दहा रुपयाला मोठे माप विकले जात होते. यातून काही स्थानिक लोकांना रोजगार मिळत असत. प्रचंड जंगलतोड व वनव्यामुळे करवंदाची झाडं दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. मात्र, यावर्षी कोरोनासारखे संकट आल्यामुळे आणि त्यातच संचारबंदी व ताळेबंदी यामुळे करवंदे व रानमेव्याची चव दुर्मीळ झाली आहे.
उन्हाळ्याचे आगमन होताच करवंदे व इतर रानमेवा बाजारात येतो. यामध्ये कैरी, अंजीर, चिंच, जांभळे आदी डोंगरदऱ्यामध्ये तयार झालेला रानमेवा बाजारात दाखल होत असत. या करवंदे व रानमेवा यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे करवंदे व रानमेवा दुर्मीळ झाल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. रुचकर, चविष्ट, स्वस्त व औषधी असलेल्या या करवंदे व रानमेव्याची अनेकांना भुरळ पडत असते. डोंगरातील रानमेवा हे येथील स्थानिक लोकांचे या उन्हाळ्याच्या दिवसांत उत्पन्न्नाचे साधन असते. डोंगरदऱ्यातील करवंदे व रानमेवा तयार झाला असून त्याची ताळेबंदीमुळे विक्री होत नाही. त्यामुळे या फळांची चव सध्या दुर्मीळ झाली आहे. या रानमेव्याची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची मागणी असते. औषधी गुणधर्म असणारी करवंदे यंदा बाजारपेठेत दाखल होत नसल्यामुळे या रानमेव्याची चव प्रत्येकाला मिळेलच असे नाही.