‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेतून अखेर मुक्तता
By admin | Published: October 26, 2015 11:02 PM2015-10-26T23:02:25+5:302015-10-27T00:23:11+5:30
मिरजे गावात आनंदोत्सव : २२ वर्षांपासून दूषित पाणी; बाभळीच्या पानांचा रंग उतरत होता पाण्यात; विहिरीची श्रमदानातून स्वच्छता
दशरथ ननावरे -- खंडाळा -‘स्वच्छ आणि शुद्ध पाणी’ हा ग्रामस्थांचा मूलभूत हक्क आहे. पण, हाच हक्क मिरजे, ता. खंडाळा येथील गावकऱ्यांचा तब्बल २२ वर्षे अस्वच्छतेने हिरावून घेतला होता. परंतु याच्या कारणाचा उलगडाच होत नव्हता. खंडाळ्याचे गटविकास अधिकारी विलास साबळे यांच्या हे लक्षात आल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने कारणावरच्या मुळाशी जाऊन शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर बाभळीच्या मुळावरच घाव घालून स्वच्छ पाण्याचा मार्ग मोकळा करून गावकऱ्यांचा जिवाचा घोर कायमचा नष्ट केला. गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
मिरजे हे खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील गाव. तीन हजारांच्या घरात लोकसंख्या गावच्या पूर्वेला असणाऱ्या टेकडीच्या मध्यवर्ती ठिकाणी तलावाच्या खाली गावची पाणीपुरवठ्याची विहीर! भरपूर पाणी; पण पिण्याचे समाधान गावकऱ्यांना कधी मिळालेच नाही. कारणही तसंच होतं, गावात नळपाणीपुरवठ्याद्वारे येणारे पाणी नेहमी काळेच दिसायचे. त्यामुळे हे घडतंय का? यामुळे माणसांच्या जीविताला तर काही धोका पोहोचणार नाही ना? एक ना अनेक प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत होते. बहुधा पाईपालाईन खराब झाली असावी, असे गृहित धरून संपूर्ण पाईपलाईनच बदलण्यात आली; पण पाण्याचा रंग काही बदलला नाही. अनेक उपायानंतरही पाणी तसेच राहिले. एक ना दोन दिवस तब्बल २० ते २२ वर्षे!
गेल्या महिन्यात गावकऱ्यांनी तडख गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पाण्याचा प्रश्न कसा गंभीर आहे, हे समजावून सांगितले. हा प्रश्न लक्षात घेऊन सलग आठ दिवस टीसीएल सातत्याने टाकण्याचे ठरविले. आठ दिवसांनंतर पाण्याचे नमुने तपासण्यात आले. रासायनिक बायोग्राफिक तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवाल मिळाले; मग पाणी काळे का? याचा शोध सुरू केला.
गटविकासअधिकारी विलास साबळे यांनी सातारा येथील भूजल सर्वेक्षण विभागाशी संपर्क करून पाण्याचा प्रवाह तपासण्यास सांगितला; परंतु प्रवाह योग्य आहे. मात्र विहिरीच्या भोवती असणाऱ्या बाभळीच्या झाडाचा पाला पाण्यात पडून त्याचा रंग पाण्यात उतरत असल्याचे लक्षात आले. मग विहिरीची आणि भोवतालची संपूर्ण सफाई करून बाभळ काढण्यात आली. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून ती साफ केली. त्यानंतर पाणी स्वच्छ आणि निर्मळ, शुद्ध येऊ लागले. २२ वर्षांची गावकऱ्यांची काळ्या पाण्यातून मुक्तता झाली. अधिकारी कर्तव्यदक्ष असतील तर नागरिकांच्या समस्या सुटू शकतात.
गावचे सरपंच वंदना कडाळे, उपसरपंच पिलाजी जाधव, सदस्य कुंडलिक जाधव, धनंजय कुंभार, शशिकांत कडाळे, सुनील कडाळे ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा केला. पाणी स्वच्छतेला यश आल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
मिरजे गावात पाणी अस्वच्छ असल्याने गेली अनेक वर्षे भीतीच होती. वेळोवेळी केलेले उपाय निरर्थक ठरले. भूजल सर्वेक्षणातून प्रश्न मार्गी लागला, त्यामुळे शुद्ध पाणी मिळू लागले आहे.
-वंदना कडाळे, सरपंच
गेल्या दोन दशकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी मुळाशी जाऊन प्रश्न मिटविला. आम्हाला काळ्या पाण्यातून मुक्तता मळाल्याचा आनंद आहे.
- सुनील कडाळे, ग्रामस्थ
लोकांच्या समस्येचा अभ्यास करून पाणी मूलभूत प्रश्नावर मात करता आली, लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मिटला.
-विलास साबळे, गटविकासअधिकारी