चळवळीत ब्लॅकमेल करणाऱ्यांची गय नाही!
By admin | Published: September 21, 2015 11:21 PM2015-09-21T23:21:03+5:302015-09-21T23:57:17+5:30
रामदास आठवलेंचा इशारा : सातारकरांच्या वैयक्तिक व्यवहारात लुडबूड करणाऱ्यांची पत्रकबाजी बंद करा
सातारा : ‘रिपाइं हा चळवळीतील पक्ष आहे. या पक्षाच्या नावावर साताऱ्यातील उद्योजक, व्यापारी अथवा सर्वसामान्य जनतेला कुणी ब्लॅकमेलिंग करत असेल तर त्याची बिलकुल गय केली जाणार नाही,’ असा खणखणीत इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला. साताऱ्यात आल्यानंतर ‘चळवळीत ब्लॅकमेलिंग’ हा गंभीर विषय त्यांच्या कानावर पडला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे सामाजिक विषय माझ्याकडे आल्यानंतर मी लेटर हेडवर तत्काळ सही करतो. मात्र, कुणी वैयक्तिक जागा अथवा व्यवहार असे नाजुक विषय घेऊन आले तर मी स्पष्टपणे त्यांना नकार देतो. जर मी एवढा भूमिकेवर ठाम असेन तर माझ्या कार्यकर्त्यांनीही त्याच पद्धतीने वागले पाहिजे.’ असेही ते म्हणाले.‘राज्यातील महामंडळांची पदे लवकरच भरली जाणार असून भाजप व शिवसेनेत ७०-३० असा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपच्या कोट्यातून रिपाइंला जागा मिळणार असून आम्हाला यावेळी तरी किमान न्याय मिळेल,’ असाही आशावाद आठवले यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आम्हाला १० टक्के वाटा देण्याचे ठरलेले असतानाही वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या गेल्या. ‘सबका साथ सबका विकास’ अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे गेल्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत राहीलो. त्यांना आम्ही साथ तर दिली आहे. आता किती विकास करतील पाहुया.’‘मला मंत्रीपद दिले तर इतरही छोट्या-मोठ्या पक्षांना सरकारमध्ये नाईलाजाने सामावून घ्यावे लागेल, अशी अडचण भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केल्यामुळे माझ्या मंत्रीपदाचा मार्ग सध्या अडला आहे. सध्या मी दुष्काळी भागाचा दौरा करत असून येत्या दोन दिवसांत उस्मानाबादमध्ये दुष्काळ परिषद घेत आहे,’ असेही आठवले यांनी सांगितले.साताऱ्यातील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसंदर्भात मी स्वत: लक्ष घालणा असून ते शिकलेल्या प्रतापसिंह हायस्कूलच्या मदत निधीसाठीही पुढाकार घेणार आहे, अशी घोषणाही यावेळी आठवले यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रसारमाध्यमांना विनंती
सातारा जिल्ह्यात सुरू झालेल्या या नव्या विचित्र प्रकाराबाबत त्यांनी पत्रकारांसमोरच जिल्ह्याध्यक्ष अशोक गायकवाड यांना विचारणा केली. तेव्हा गायकवाड यांनीही स्पष्ट केले की, ‘कोणत्याही कार्यकर्त्याचे पत्रक माझ्या परवानगी शिवाय प्रसिद्ध केले जाऊ नये, अशी विनंती मी प्रसारमाध्यमांना केली आहे. रिपाइंच्या नावावर असे उद्योग करणाऱ्यांना तत्काळ रोखले जाईल.’
राजेंचा ‘निळा ड्रेस’ पाहताच जुने दिवस ‘आठवले’
सातारा : दुष्काळी दौरा करण्यासाठी ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले सोमवारी साताऱ्यात आले तेंव्हा राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची खास भेट घेतली. यावेळी राजेंच्या अंगावरील ‘निळा ड्रेस’ पाहताच आठवले भावुक झाले. ‘गेल्या वर्षी लोकसभेला उदयनराजे रिपाइंचेच खासदार होणार होते. त्यांच्यासाठीच आम्ही साताऱ्याचा मतदारसंघ भांडून घेतला होता,’ या जुन्या आठवणीला त्यांनी यावेळी उजाळा दिला.
सांगली जिल्ह्याचा दौरा आटोपून आठवले रविवारी रात्री साताऱ्यात आले. सोमवारी सकाळी पत्रकारांसोबत दुष्काळावर चर्चा करत असतानाच अकस्मातपणे उदयनराजेंची या ठिकाणी ‘एन्ट्री’ झाली. आठवले सध्या भाजपसोबत सत्तेवर आहेत, तर उदयनराजे विरोधी राष्ट्रवादीचे खासदार. त्यामुळे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते एकत्र आल्यानंतर काय बोलणार, याकडे साऱ्याच पत्रकारांचे लक्ष लागून राहिलेले.
उदयनराजेंच्या अंगावर जीनचा निळा शर्ट व निळी पॅन्ट होती. ‘आठवलेंना भेटण्यासाठी या रंगाचा ड्रेस राजेंनी मुद्दाम वापरला की काय?’ असा खोचक सवाल पत्रकारांनी विचारताच राजे ताडकन उत्तरले, ‘मी पूर्वी पासूनच निळा आहे.’ मात्र, या ड्रेसकडे भावनिक नजरेने पाहत आठवले म्हणाले, ‘खरंतर उदयनराजे रिपाइंचेच खासदार होणार होते. केवळ त्यांच्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपकडून मागून घेतला होता, परंतु तो योग काही आलाच नाही.’
उदयनराजेंचा अजितदादांना टोला
सातारा : महाराष्ट्रातील मागील सत्तेच्या काळात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन पिढ्या बरबाद झाल्या, असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
सोमवारी विश्राम गृहात पत्रकारांशी बोलताना उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘कॉँग्रेस अन् राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणे अशक्य वाटते, कारण दोघेजण एकत्र येण्यासाठी जो स्वार्थ असावा लागतो तो सत्तेचा विषय पुढील चार वर्षे चर्चेलाच येऊ शकत नाही. त्यामुळे या दोघांकडेही कसलेच ‘अेम’ नाही. म्हणून आता यांच्यावर जनतेनेच ‘नेम’ साधावा.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळ असतानाही आजही ‘टंचाई अथवा टंचाई सदृश’ परिस्थिती असाच शब्द वापरला जात आहे. तेव्हा शासनाने तत्काळ अध्यादेश काढून ‘टंचाई’ ऐवजी ‘दुष्काळ’ असा शब्द सरकारी कागदावर वापरायला हवा, अशीही मागणी त्यांनी केली.