साताऱ्यातील माचीपेठ येथे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये स्फोट; एक ठार, दोन गंभीर जखमी

By दीपक शिंदे | Published: October 2, 2024 02:23 PM2024-10-02T14:23:01+5:302024-10-02T14:24:32+5:30

इमारतीच्या काचा फुटल्या; बॉम्ब स्कॉड, श्वान पथकाकडून तपासणी

Blast at servicing center at Machipeth in Satara; One killed, two seriously injured | साताऱ्यातील माचीपेठ येथे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये स्फोट; एक ठार, दोन गंभीर जखमी

साताऱ्यातील माचीपेठ येथे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये स्फोट; एक ठार, दोन गंभीर जखमी

सातारा : येथील माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट होऊन एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना आज, बुधवार, दि. २ रोजी दीडच्या सुमारास घडली. घटनास्थळी बॉम्ब स्कॉड व श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.

मुनीर पालकर (वय ३५, रा. गुरुवार परज, सातारा), असे या भीषण स्फोटात ठार झालेल्या तर हारुण बागवान आणि उमर बागवान (रा. सातारा), अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या दोघांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यातील अदालत वाड्याशेजारी माची पेठ आहे. या पेठेमध्ये रस्त्याला लागूनच सर्व्हिसिंग सेंटर आणि एक दुकान आहे. या दुकानामध्ये मुनीर पालकर आणि हारुण तसेच उमर हे तिघे बसले होते. त्यावेळी अचानक शाॅर्टसर्किट होऊन या दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, मुनीर पालकर हा तब्बल तीस फूट हवेत उडून डांबरी रस्त्यावर पडला. त्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. इतर दोघे दुकानाच्या शेजारीच रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण सातारा हादरून गेला. 

शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांना या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे जाणून घेण्यासाठी सातारकरांनीही घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. समर्थ मंदिरहून पोवई नाक्याकडे जाणारा रस्ता पोलिसांनी दोन्ही बाजूने बंद केला होता.

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे एकापाठोपाठ दोन स्फोट

काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, या ठिकाणी एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. हवेत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा धूर दिसत होता. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

Web Title: Blast at servicing center at Machipeth in Satara; One killed, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.