चितळीतील घरफोडीत १६ तोळ्यांचे दागिने लंपास, भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:46 AM2019-05-08T10:46:03+5:302019-05-08T10:47:29+5:30
मायणीतील दोन पानटपऱ्या व चितळी येथील पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी रोकड, दागिन्यासह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर चितळीतील एकाच घरातून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने नेण्यात आले आहेत. एकाच रात्रीत या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मायणी : मायणीतील दोन पानटपऱ्या व चितळी येथील पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी रोकड, दागिन्यासह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर चितळीतील एकाच घरातून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने नेण्यात आले आहेत. एकाच रात्रीत या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिससूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मायणी येथील मोराळे आणि वडूज रस्त्यावरील दोन पान टपऱ्या अज्ञात चोरांनी फोडल्या. या दोन्ही टपऱ्यातील अंदाजे १३०० रुपयांची रोकड लंपास केली. तसेच चितळी येथेही चोरीच्या घटना घडल्या.
चितळीतील दिलीप संभाजी कुंभार हे कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून घराच्या छतावरती झोपण्यासाठी गेले होते. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास वडील जागे झाल्यानंतर घरावरून खाली आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी घरातील इतरांना जागे केले. त्यावेळी कपाटातील कपडे विस्कटलेली दिसली. तसेच लोखंडी पेटी व लाकडी कपाटातीलही साहित्य विस्कटलेले आढळले.
या चोरीदरम्यान, अज्ञाताने तीन तोळे वजनाचा राणीहार, सोन्याची चेन, अर्धा तोळा वजनाची कानातील फुले, एक तोळ्याची बोरमाळ, अडीच तोळ्याचे गंठण, दोन सोन्याच्या अंगठ्या, बहिणीचे गंटण, नेकलेस आदी मिळून सुमारे १६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने नेले. या दागिन्यांची आजच्या बाजारभावाने किंमत सुमारे ४ लाखांवर आहे. तसेच यावेळी रोखडही लंपास करण्यात आली.
याच दरम्यान चितळी गावातील दादा विठ्ठल भिसे, यशवंत उत्तम चव्हाण, नारायण संतु भिसे, मंगल दीपक खवळे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नसल्याचे दिसून आले. या चोरीनंतर साताऱ्याहून ठसे तज्ज्ज्ञ व श्वान पथक बोलविण्यात आले होते. या चोरीची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर हे करीत आहेत.