धन्य धन्य लंबोदरा.. आल्या जलधारा!
By Admin | Published: September 18, 2015 10:33 PM2015-09-18T22:33:15+5:302015-09-18T23:13:46+5:30
बाप्पाच्या दर्शनाला पाऊस : ओढे नाले भरुन वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
सातारा: ‘गणपती बाप्पा येताना पाऊस घेऊन ये...’ या आशयाचे पोस्ट सोशल मीडियावर गेले पंधरा दिवस फिरत होते. गणेशाचे गुरुवारी थाटामाटात आगमन झाले. खटावचा अपवाद वगळला, तर कोठेच गुरुवारी पाऊस झाला नाही; पण गणेशभक्तांनी तितक्याच भक्तिभावाने स्वागत केले. बाप्पाच्या दर्शनाला शुक्रवारी पहाटे चक्क वरुणराजाच आला.सातारा शहरासह महाबळेश्वर, खंडाळा, शिरवळ, माण, खटाव आदी परिसरात शुक्रवारी रिमझिम पाऊस पडत होता. यामुळे बळीराजा सुखावला असून, हातचे गेलेले पिकं वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.कोणत्याही सणाची खरेदी धामधूम पावसावरच अवलंबून असते. म्हणावा असा पाऊस न झाल्यास बळीराजा साध्या पद्धतीने सण साजरे करतो. त्यामुळे बाजार पेठेतील पैसा फिरत नाही. साहजिकच बाजारपेठेलाही उतरती कळा येत असते.जिल्ह्यात जूनचा पहिला आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र, दोन महिने पावसाने पाठ फिरविली. सप्टेंबरमध्ये काही दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या आठवड्यात काहीसा पाऊस झाला. पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणी दुबार पेरण्याची वेळ आली. बळीराजा बरोबरच सर्वसामान्य जनतेचेही पावसाकडे लक्ष लागले होते. सातारा शहरात शुक्रवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यवतेश्वरच्या डोंगरावर काळे ढग जमा झाल्याने अल्हाददायी वातावरण निर्माण झाले होते. सातारा, नागठाणे, शिवथर, लिंब परिसरात रिमझिम पाऊस पडत होता. त्याचप्रमाणे फलटण शहरासह आदर्की, जावळी तालुक्यात मेढा, सायगाव, खटाव तालुक्यात औंध त्याचप्रमाणे महाबळेश्वर, पाटण तालुक्यातही चांगला पाऊस झाला.
शिरवळ : शिरवळ व परिसरात सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावत शिरवळकरांना अक्षरश: झोडपले. शिरवळचा आठवडा बाजार असल्याने व्यापारी आपापल्या कामात व्यस्त होते.
यावेळी सकाळी आठपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची विशेषत: विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. पावसाने तब्बल तीन तास दमदार हजेरी लावल्याने रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते.
लोहोम परिसरातही दिवसभर दमदार पाऊस झाला. यामुळे समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
आठवडा बाजारावर पाणी
शिरवळचा आठवडा बाजार शुक्रवारी असतो. बाजाराची तयारीही झाली होती. शुक्रवारी पावसाला सुरूवात झाली. यामुळे आठवडा बाजारावर पाणी फिरले. तसेच गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून लोक मोठ्या संख्येने शहरात येत असतात. शुक्रवारच्या पावसामुळे सर्वांचीच पळापळ झाली. मात्र, या पावसामुळे पिण्याचे पाणी व जनावरांचा चाराप्रश्न निकालात येणार असल्याने सर्वांनीच या पावसाचे उत्साहात स्वागत केले. भर पावसातही काही गणेशभक्त छत्र्या घेऊन बाहेर पडले होते.