अंध भावंडे चालवतायत किराणा दुकान!
By admin | Published: October 29, 2016 12:25 AM2016-10-29T00:25:14+5:302016-10-29T00:29:48+5:30
डोळसांच्या डोळ्यात अंजन : मोबाईल दुरुस्तीसह किराणा मालाचीही विक्री
सणबूर : निगडे, ता. पाटण येथील भरत लक्ष्मण कदम व अशोक लक्ष्मण कदम हे जन्मत:च अंध असलेले दोन सख्खे भाऊ अंधत्वावर मात करीत स्वावलंबी जीवन जगत आहेत. त्यांचा हा लढा डोळस व्यक्तींच्या डोळ्यात अंजन घालणारा असाच आहे.
वाल्मीक पठारावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेले निगडे हे गाव. या गावातील अशोक व भरत हे दोन सख्खे भाऊ. या दोघांच्या पदरी जन्मत:च अंधत्व आले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलांना दृष्टी मिळावी, यासाठी वडील लक्ष्मण कदम यांनी काबाडकष्ट करून मुलांवर उपचार केले. मात्र पैसा खर्च करूनही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. किंबहुना भरत व अशोक या दोघांच्याही आयुष्यात कायमचा अंधारच राहिला.
लहानपणी आपल्या बालपणीच्या मित्राबरोबर शाळेत जावे. त्यांच्याबरोबर शिकावे. खेळावे. बागडावे. ही इच्छा असूनही आयुष्यात आलेल्या काळोख्याने सर्व वाटा बंद करून टाकल्या. दृष्टी नसल्याने त्या दुर्गम भागात शिकवणार कोण? त्यामुळे या दोघांचे शिक्षणही अपूर्णच राहिले. दोघांनाही दृष्टी नसली तरी आई-वडिलांच्या जिवावर जगणे या दोघांनाही मान्य नाही. स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द त्यांना गप्प बसून देत नाही. दोन्ही डोळ्यांनी दिसत नसले तरी स्वत: कष्ट करून जगले पाहिजे, हा विचार घेऊन या दोन्ही भावांनी आपले वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.
दुकानातील कोणतीही वस्तू ग्राहकास अचूकपणे देऊन हिशेब करणे, मोबाईल रिचार्ज करणे हे काम तो अचूक करून व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो. एखादा क्रमांक त्याने एकदा पाठ केला की तो कधीच विसरत नाही. गावातील सर्वांचे नंबर त्याच्या तोंडपाठ आहेत. त्यामुळे कुणाला फोन करायचा असेल तर ग्रामस्थ भरतला क्रमांक विचारतात. भरत मोबाईल दुरुस्तीही करतो. स्वत:ची कामे स्वत: करून हे दोन सख्खे भाऊ दृष्टी नसताना आत्मविश्वासाच्या जोरावर सन्मानाने जगत आहेत.
सध्याच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घ्यायला हवा. समाजाने या दोन अंध मुलांच्या पाठीशी उभे राहायला हवे. सामाजिक संस्थानी त्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. शासनाकडूनही त्यांना काही मदत मिळण्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)
अशिक्षित तरीही व्यवहार ज्ञान उत्तम...
थोरला अशोक हा गावातील आपल्या स्वत:च्या घरी भुसारी मालाचे दुकान चालवतो. तर भरतने ढेबेवाडी बाजारपेठेत दुकान सुरू केले आहे. या व्यवसायासाठी तो रोज पन्नास किलोमीटरचा प्रवास करतो. ज्या वाहनातून त्याचा प्रवास सुरू असतो, ते वाहन सध्या कोणत्या बसथांब्यावर थांबले आहे, हे तो अचूक सांगतो. कोणतेही शिक्षण न घेता त्याला व्यवहारी ज्ञान उत्तम आहे. एक रुपयापासून हजार, दोन हजार रुपयांचा हिशोब तो सहज करतो. तर कोणत्याही नोटा हातामध्ये आल्या तर तो सहज ओळखतो.