नागरिकांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या आवळल्या मुसक्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:27+5:302021-04-10T04:38:27+5:30

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमधील वीर धरण परिसरामध्ये सुटीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना घटक ...

Blind smiles of inter-district gangs robbing citizens! | नागरिकांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या आवळल्या मुसक्या!

नागरिकांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या आवळल्या मुसक्या!

googlenewsNext

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमधील वीर धरण परिसरामध्ये सुटीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना घटक शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील सहा जणांच्या शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करीत मुसक्या आवळल्या आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. दरम्यान, लूटमार, दरोडा असे गुन्हा दाखल असलेल्या संबंधित टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ जवळील तोंडल (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमधील नीरा नदीच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या प्रेमीयुगुलांना व नागरिकांना लुटण्याच्या घटना घडलेल्या आहे. पोलीस पथक गस्त घालत असताना तोंडाला दुचाकीवर मास्क लावलेल्या अवस्थेमध्ये संशयितरीत्या फिरताना निदर्शनास आले. यावेळी शिरवळ पोलिसांनी हटकले असता त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी पोलिसांनी चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करीत नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरील टोळीप्रमुख महावीर सुखदेव खोमणे (वय २३, रा. चंद्रपुरी ता. माळशिरस जि. सोलापूर), शाहरुख महमुलाल बक्षी (२४ मूळ रा. मार्डी ता. माण सध्या रा. चंद्रपुरी जि. सोलापूर), भैय्या हुसेन शेख (२५, रा. कंबळेश्वर, ता. बारामती, जि.पुणे) व १७ वर्षीय अल्पवयीन युवकाच्या मुसक्या आवळल्या तर अन्य दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन लोणंद बाजूकडे पलायन केले असता फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी पळून गेलेल्या अमीर मौल्लाली मुल्ला (२१ रा. चंद्रपुरी, जि.सोलापूर), मयूर अंकुश कारंडे (वय २०, रा. तावशी ता. इंदापूर, जि. पुणे) यांना मोठ्या शिताफीने जेरबंद करीत शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी शिरवळ पोलिसांनी टोळीप्रमुख महावीर खोमणे याच्याकडून कुकरी, मोबाइल, नंबर प्लेट नसलेली दुचाकी, शाहरुख बक्षी याच्या ताब्यातून चाकू, मोबाइल व नंबर प्लेट उलटी लावलेली (एमएच ४२ एव्ही ०८४२) ही दुचाकी असा एकूण साधारणपणे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या टोळीने पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला असल्याने संबंधित टोळीविरुद्ध लवकर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

दरम्यान, तपासादरम्यान शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील दरोडा व दरोड्याचा प्रयत्नाचे गुन्हे उघडकीस आले असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

चौकट

पर्यटकांचा वावर जास्त..

शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिरायला आलेल्या नागरिकांना केंद्रबिंदू ठरवत घटक शस्त्रांचा वापर करीत सराईत गुन्हेगार असलेल्या सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील या टोळीतील प्रमुख महावीर खोमणे याच्यावर दहिवडी, नातेपुते, जि. सोलापूर, वालचंदनगर जि. पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, इतरांवर विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दखल असून संबंधित लूटमार करणाऱ्या टोळीकडून अशा प्रकारचे गुन्हे घडले असल्यास संबंधितांनी आपले हद्दीमधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करावी, असे आवाहन शिरवळ पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.

०९शिरवळ प्रेमीयुगुलांसह नागरिकांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात आले. यावेळी शिरवळ पोलीस अधिकारी व कर्मचारी.(छाया : मुराद पटेल)

Web Title: Blind smiles of inter-district gangs robbing citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.