विद्यार्थी परिषदेकडून रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:03+5:302021-05-16T04:38:03+5:30
कऱ्हाड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ...
कऱ्हाड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष अमित राजमाने व शहरमंत्री प्रशांत साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात २७ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ऋषिकेश पाटील, अजय मोहिते, स्वप्निल पाटील, आकाश शेडगे, आरोह कुलकर्णी, दीपक मोरे, सुमित पवार, प्रणय संपकाळ, गणेश डुबल, गणेश हलवर उपस्थित होते.
रस्त्यात अंधाराचे साम्राज्य
कऱ्हाड : येथील जयवंतराव जाधव आर्केडपासून दूरध्वनी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर पंकज हॉटेलपासून पुढे अंधाराचे साम्राज्य आहे. या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. कोल्हापूर नाका ते शाहू चौक या मुख्य मार्गाला हा पर्यायी मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वळीव पावसामुळे झाडांना मिळतेय संजीवनी
कऱ्हाड : गत काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे महामार्गावरील दुभाजक आतील फुलझाडांना संजीवनी मिळाली आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर सुशोभीकरणासाठी दुभाजकामध्ये फुलझाडे लावण्यात आली आहेत. मात्र, या झाडांना वेळेत पाणी घातले जात नसल्याने झाडे कोमेजून जात आहेत. पाऊस पडल्यामुळे या झाडांना जीवदान मिळाले आहे.
उंडाळे येथे परिचारिकांचा सत्कार
कऱ्हाड : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे परिचारिका दिनाचे औचित्य साधून रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते परिचारकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, सदस्य काशिनाथ कारंडे, शरद पोळ, उपसरपंच बापूराव पाटील, धनाजी पाटील, माधव अंबवडे, अक्षय पाटील, बिपीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त
कऱ्हाड : शहरात दोन दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. दिवसात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गत काही दिवसांपासून हवेत प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने रात्रीच्या वेळी उष्णतेत वाढ होत आहे. त्यातच शहरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
ढेबेवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू
ढेबेवाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या काळात येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ ऑक्सिजन बेडसह कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. अनेक रुग्णांवर तेथे यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून, त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिवशी घाटातून प्रवास बनला धोक्याचा
सणबूर : ढेबेवाडी (ता. पाटण) विभागातील ढेबेवाडी ते नवारस्ता या मार्गावर दिवशी घाटातील दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी आल्यास वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ढेबेवाडीहून पाटणला ये-जा करणाऱ्यासाठी दिवशी घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या घाटामधील काही ठिकाणच्या दरडी कोणत्या क्षणी कोसळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.