फिरत्या गाडीचं जुळलं तरुणाईशी ‘रक्ताचं’ नातं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:42 PM2018-09-30T22:42:29+5:302018-09-30T22:42:33+5:30

The blood of a moving car matched with the blood! | फिरत्या गाडीचं जुळलं तरुणाईशी ‘रक्ताचं’ नातं!

फिरत्या गाडीचं जुळलं तरुणाईशी ‘रक्ताचं’ नातं!

Next

जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय तरुण-तरुणींच्या वर्दळीचा परिसर. याच गर्दीत रस्त्याच्या कडेला एक अलिशान गाडी कायमच उभारलेली दिसते. कॉलेज मुलं-मुली गाडीत येतात अन् रक्तदान करून जातात. या फिरत्या रक्तपेढीत केवळ आठ महिन्यांत दीड हजार जणांनी रक्तदान केलं असून, या गाडीचं अन् तरुणाईचं आता जणू रक्ताचं नातं जुळलं आहे.
सातारा येथील महेश भोसले हे एका रक्तपेढीत प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांनी बारा वर्षे सेवा बजावली. या कार्यकाळात एक गोष्टी त्यांच्या लक्षात आली की, रक्तदान करण्याची अनेकांना इच्छा असते; पण केवळ आठ आणि दहा जणांसाठी रक्तदान शिबिर घेता येत नव्हते. त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. रक्तदान करण्याबाबत महाविद्यालयीन तरुणांमध्ये क्रेझ आहे; पण कॉलेजच्या व्यस्त वेळेतून त्यांना रक्तपेढीपर्यंत जाऊन रक्तदान करता येत नाही.
महेश भोसले यांनी पाच वर्षांपूर्वी बालाजी रक्तपेढी संस्थेची स्थापना केली. त्यातून जिल्ह्यात गावोगावी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले अन् सात महिन्यांपूर्वी ऐतिहासिक निर्णय घेतला. एका अलिशान गाडीत रक्तपेढीच तयार केली. त्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. घरी कोणाचा वाढदिवस असेल, एखाद्या संस्थेचा, दुकानाचा वर्धापन दिन असल्यास संस्थेत केवळ एका फोनवर गाडी संबंधित ठिकाणी हजर असते. या उपक्रमाला सातारकरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विशेषत: दुपारच्या वेळेत ही गाडी यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय परिसरात उभी असते. या परिसरात छत्रपती शिवाजी महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशन अशी महाविद्यालये आहेत. महाविद्यालय सुटल्यानंतर तरुण-तरुणी येथे येतात. नावनोंदणी करून रक्तदानही करत असतात.

दोन हजार पिशव्या साठवण क्षमता
बालाजी ब्लड बँकेत दोन हजार पिशव्यांची साठवण क्षमता आहे. तसेच कम्पोनंट यंत्रणा कार्यान्वित आहे. रक्तदान केल्यास पुढील दोन वर्षांत रक्तदात्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला तेवढेच रक्त मोफत मिळते. दोन वर्षांत वापर न झाल्यास रक्तदात्याला आयुष्यात केव्हाही तेवढे रक्त मोफत मिळते.
असे आहेत कर्मचारी
फिरत्या रक्तपेढीत डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक, चालक असे कर्मचारी कार्यरत असतात.

Web Title: The blood of a moving car matched with the blood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.