काळोख पसरताच घरांवर दगडांचा वर्षाव !

By admin | Published: July 2, 2015 11:44 PM2015-07-02T23:44:13+5:302015-07-03T01:20:08+5:30

कापील परिसर भयचकित : सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांची रात्रगस्त; परिसराला भीतीने घेरले

Blossom rocks at the door of the house! | काळोख पसरताच घरांवर दगडांचा वर्षाव !

काळोख पसरताच घरांवर दगडांचा वर्षाव !

Next

माणिक डोंगरे-मलकापूर -कापीलसह आसपासच्या गावात व वस्त्यांवरील घरांवर काळोख पसरताच दगडांचा वर्षाव होत आहे. ३० ते ३५ जणांच्या टोळक्याने परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून, परिसर भयचकित झाला आहे. या अज्ञातांच्या दहशतीने महिला, मुलांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून, खबरदारीसाठी ग्रामस्थांनी रात्रगस्त सुरू केली आहे.
पाचवड फाट्यावर रविवारी ३० ते ३५ जणांना काही ग्रामस्थांनी पाहिले. संबंधितांमध्ये काही महिलांचाही समावेश होता. वाहनातून येऊन महामार्गावर उतरल्यानंतर संबंधित लोक गटागटाने तेथून निघून गेले. त्यानंतर कापील, गोळेश्वर, आटके, काले, धोंडेवाडी परिसरात उसाच्या शिवारामध्ये ते अनेकांना दिसले. बरमुडा व टी-शर्ट घातलेले धिप्पाड पुरुष पाहून रानात कामे करणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडत आहे. कापील-कदमवस्ती येथील बंडा कदम हे बुधवारी दुपारी ४ वाजता उसात काम करत होते. त्यावेळी अचानक उसात पाच ते सहा जणांचे टोळके असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कदम घाबरून उसातून बाहेर पडले. त्यांनी आई-वडिलांसह मित्रांना याबाबतची माहिती दिली. सर्वजण त्याठिकाणी गोळा होईपर्यंत टोळके उसाच्या रानातून पसार झाले. ही खबर वाऱ्यासारखी सर्व वस्त्यांसह कापिल परिसरात पसरली. परिसरातील २०० ते ३०० युवकांसह ग्रामस्थांनी दुपारी ४ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत सुमारे २५ ते ३० एकर शिवार पालथे घातले. मात्र, ते टोळके उसातच दडून बसले असावेत, असा कयास नागरिकांनी काढला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वसंत देशमुख यांच्या घरावर उसातून दगडफेक करीत पाठीमागील दार ठोठावले गेले. ही माहिती मिळताच गावातील पाचशेपेक्षा जास्त ग्रामस्थ व युवक देशमुख यांच्या वस्तीवर गोळा झाले.
शेताला वेढा घातला. मात्र रात्री उसाच्या शेतातून त्या अज्ञात व्यक्ती बाहेर आल्याच नाहीत. शेवटी ही खबर पोलिसांना देण्यात आली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाचवड वस्ती व मोरे वस्तीवर माणिक मोरे व तानाजी मोरे यांच्या घरावर दगडफेक झाली. त्यामुळे ग्रामस्थांत आणखीणच दहशत पसरली.
या घटनांमुळे चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या चारही गावांत ग्रामस्थ व युवक रात्रगस्त घालत आहेत.


धोंडेवाडीतही टोळीचा वावर
धोंडेवाडी, ता. कऱ्हाड गावच्या शिवारातही एका शेतातील वस्तीवर हे टोळके आल्याची खबर वस्तीवरील ग्रामस्थांनी गावात दिली. गावातील २५ ते ३० युवक त्या वस्तीवर दहाच मिनिटांत पोहोचले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन संशयित उसाच्या रानात पसार झाले.
दिवसा काम; रात्री जागरण
रविवारपासून अनेक ठिकाणी या टोळीने धुमाकूळ घातला. मात्र दाट उसाच्या शेतीचा फायदा घेऊन ते पसार होत आहेत. वस्त्या-वस्त्यांवर जमावाने रात्र गस्त घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. रात्रीच्यावेळी जागरण व दिवसा कामे करून युवक वैतागले आहेत.
दिवसाही काठ्या घेऊन प्रवास
दोन्ही बाजूने उसाची शेती व मधून लहान-लहान रस्ते व पाणंद रस्त्याने प्रवास करताना युवक दिवसाही काठ्या हातात घेऊनच प्रवास करत आहेत.

पाचवड, कापील, गोळेश्वर परिसरात पोलिसांची रात्रगस्त सुरू आहे. ग्रामस्थही पोलिसांना मदत करीत आहेत. सुरक्षिततेसाठी आम्ही ग्रामस्थांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी घाबरू नये. कोठेही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- राजलक्ष्मी शिवणकर,
पोलीस उपअशीक्षक, कऱ्हाड
रविवारपासून गावातील मळे व वस्त्यांवरील ग्रामस्थ दहशतीमुळे झोपलेले नाहीत. टोळके दिसल्याचा फोन आला की मतभेद विसरून आम्ही मदतीला धावत आहोत. जागरण व धावपळ करून युवक वैतागले आहेत.
- मोहन जाधव,
सरपंच, कापील
चार दिवसांपासून परिसरात अज्ञातांनी चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. सारे गाव व वस्त्या रात्रभर जागरण करत आहेत. दगडफेकीच्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर रात्री पोलिसांनी दोनवेळा गस्त घातली; मात्र ते हायवे व काटपान मळा, हौदमळा पाचवड वस्तीकडेच गस्त घातली. कदम वस्ती, मोरे वस्ती, देशमुख वस्ती अशा आडरानातील वस्तीकडेही त्यांनी गस्त घालावी.
- शांताराम जाधव,ग्रामस्थ, कापील
गेल्या चार दिवसांपासून अज्ञातांनी आम्हाला हैराण केले आहे. पुरुषांसह युवकांना रात्रभर जागरण करून गस्त घालावी लागत आहे. याचा कुटुंबावर चांगलाच परिणाम होत आहे. शेतात जाण्यासाठी महिला घाबरत आहेत.
- स्वाती जाधव,
गृहिणी, हौदमळा-कापील


दहा वस्त्यांमध्ये विखुरलं गाव
कापील-गोळेश्वर गावांसह विविध नावाने सुमारे १० वस्त्यांमध्ये या गावची वस्ती विस्तारलेली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अज्ञातांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संशयित दिसल्याची किंवा दगडफेक झाल्याची खबर मिळताच सर्व मतभेद विसरून पाचच मिनिटांत सर्वजण एका जागेवर गोळा होत आहेत.
मोबाईलमुळे संपर्क प्रभावी
रविवार पासून पाचवडवस्ती ते कापील या परिसरात उसाच्या रानातून दहा ते पंधरा जणांचे टोळके आले असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. अशा परिस्थितीत या दहशतीचा प्रतिकार करण्यासाठी वस्त्यांसह गावातील ग्रामस्थ व युवक मोबाईलवर संपर्क करून केवळ काही मिनिटांतच एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत.

काही कुटुंबे स्थलांतरित
कापील गावाचा विस्तार हौद मळा, काटपान मळा, सावंत मळा, घुमट मळा, मोरे वस्ती, पाळसकर वस्ती अशा पद्धतीने लहान-लहान वस्तीमध्ये विखुरलेला आहे. एक-दोन घरांच्या वस्त्यांवरील कुटुंबांना तर गावातील घरात स्थलांतरित करण्यात आले आहे.

Web Title: Blossom rocks at the door of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.