कलेढोण होणार पाणीदार अन् हिरवेगार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:10 PM2019-02-03T23:10:59+5:302019-02-03T23:11:03+5:30
कलेढोण : आपले गाव पाणीदार अन् हिरवेगार करण्यासाठी कलेढोणमधील महिलांनी पदर खोचले आहेत. गावात ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करून राबवलेल्या ...
कलेढोण : आपले गाव पाणीदार अन् हिरवेगार करण्यासाठी कलेढोणमधील महिलांनी पदर खोचले आहेत. गावात ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करून राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धांना महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. जणू ‘हम भी कुछ कम नहीं,’ असा संदेशच त्यांनी गावकऱ्यांना दिला.
कलेढोणकरांनी मोठ्या हिमतीने गटातटांचे बुरुज ढासळून, पाणी फाउंडेशनच्या कामात झोकून देऊन काम करण्याचा निर्धार केला आहे. त्या कार्यात महिलांही मागे राहिल्या नाहीत. त्यांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उडी घेतली आहे.
महिलांनीच गावात, मळ्यात, वस्तीवर ठिकठिकाणी महिलांच्या बैठका घेतल्या. गाव पाणीदार व हिरवेगार करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले.
अधिकाधिक महिलांच्या सहभागासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये वाण म्हणून केशरी आंब्यांची रोपे देण्यात आली. कलेढोण पाणी फाउंडेशनच्या समितीमार्फत पर्यावरण, जलबचत, वृक्षलागवड या विषयांवर
रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये महिलांनी पाण्याची बचत, वृक्षलागवड काळाची गरज, दुष्काळाची तीव्रता असे संदेश देणाºया रांगोळ्या साकारल्या. त्या रांगोळ्याही सर्वांचे आकर्षण ठरल्या.
दरम्यान, महिलांचा उत्साह पाहून शिवार संस्थेने जलसंधारणाच्या कामांसाठी ४५ दिवस जेसीबी मशीन महिलांच्या स्वाधीन करण्याचे जाहीर केले. महिलांनी स्वनिधीतून ४५ दिवस जेसीबी मशीन चालवण्याचा निर्धार केला. त्यासाठी लागणार इंधन महिलांनी त्यांच्या पातळीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात
आला. त्यानुसार महिलांनी जेसीबीसाठी लागणारे सुमारे चारशे लिटर डिझेल पुरवण्याचे जाहीर
केले. माळी वस्तीवरील महिलांनी पन्नास लिटर डिझेल देण्याचे मान्य केले. असाच निधी कलेढोण अंतर्गत येणाºया वाड्या-वस्त्यांवरील महिलांनीही जाहीर केला आहे.
यावेळी तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे, संजय साबळे यांनीही मार्गदर्शन केले. रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये नीता लोखंडे, अभिजित शिंदे व संध्या लिगाडे यांचे अनुक्रमे पहिले तीन क्रमांक आले.
या कार्यक्रमाला कलेढोणमधील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाने महिलांमध्ये उत्साह जाणवत होता.
अन् आजीबार्इंच्या उत्तराला टाळ्यांनी दाद..
गाव पाणीदार व हिरवेगार करण्यासाठी महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मूठ आवळली आहे. दरम्यान, गावकºयांना मार्गदर्शन करताना दुष्काळी स्थितीत आंब्याची झाडे जगवायची कशी? याबाबत प्रश्न उपस्थितीत होताच, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे यांनी एका आजीलाच झाडे कशी जगविणार? असा प्रतिप्रश्न केला. त्यावेळी नातवाला दररोज झाडाजवळ अंघोळ घालणार, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आजीबार्इंना उत्स्फूर्त दाद दिली.