वहिनी-भावावर विळ्याने वार
By admin | Published: May 8, 2016 12:32 AM2016-05-08T00:32:37+5:302016-05-08T00:33:19+5:30
दोघे जखमी : चेवलेवाडी-नेरळे येथे किरकोळ कारणावरून घडली घटना
पाटण : मोरणा विभागातील पुनर्वसित चेवलेवाडी-नेरळे येथे दिराने भावजय व सख्खा भाऊ या दोघांवर विळ्याने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यात भावजय गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी अनिल सुतार (रा. चेवलेवाडी) याच्याविरुद्ध पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास अनिल सुतार याची पत्नी मुक्ता व शोभा रमेश सुतार (वय ३२, रा. चेवलेवाडी) यांची मुलगी रेश्मा यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. दरम्यान, रात्री अनिल सुतार कामावरून घरी आल्यानंतर रेश्माने माझ्याशी भांडण केल्याचे मुक्ताने सांगितले. याचा राग मनात धरून अनिलने घरातील धारदार विळा हातात घेऊन रेश्मावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेश्माची आई शोभा यांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनिलने शोभा यांच्या डोक्यात विळ्याने वार केले. याचवेळी शोभाचा लहान दीर सुनील हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्याच्याही कपाळावर अनिलने विळ्याने वार केला.
या भांडणात शोभा सुतार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेची फिर्याद शोभा रमेश सुतार यांनी पाटण पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस हवालदार काशीद तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)