साताऱ्यात निळं वादळ
By admin | Published: January 16, 2017 12:29 AM2017-01-16T00:29:09+5:302017-01-16T00:29:09+5:30
बहुजन क्रांती मोर्चा : ‘अॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी करा ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन
सातारा : ‘ऊठ माणसा जागा हो... बहुजन क्रांतीचा धागा हो’, ‘अॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘हम सब मैदान में, संविधान के सन्मान में...’ अशा घोषणा देत साताऱ्यात रविवारी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. यामध्ये लाखो आंदोलनकर्ते सहभागी झाल्याने साताऱ्यात सर्वत्र निळं वादळ अवतरल्याचा आभास होत होता. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय व यंत्रणा उभी करावी, महिलांवरील अत्याचार निवारण्याचे कायदे अधिक कडक करावेत, कोपर्डी तसेच त्यापूर्वी व त्यानंतर घडलेल्या घटनांतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी साताऱ्यात रविवारी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच मिळेल त्या वाहनांनी ग्रामीण भागातून भीमसैनिक साताऱ्यात दाखल होऊ लागले. निळे झेंडे, उपरणे विक्रीसाठी विक्रेतेही साताऱ्यात दाखल होत होते. सातारा पालिकेच्या समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ११ वाजताच गटागटाने आंदोलनकर्ते येऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राजपथावरून मोती चौक मार्गे राधिका रोड, मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोवई नाका येथे आला. त्या ठिकाणी तरुणींनी निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थिनींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी) कडेकोट बंदोबस्त मोर्चात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सातारा जिल्हा पोलिसांनी काटेकोर नियोजन केले होते. मोर्चा निघणार असलेल्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविली होती. त्यामुळे मोर्चाला कोठेही अडथळा आला नाही. ठिकठिकाणी पोलिसांच्या गाड्या तैनात केल्या होत्या.