जरंडेश्वर कारखानाप्रश्नी संचालक मंडळाने घेतली नारायण राणे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:05+5:302021-07-18T04:28:05+5:30
कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त केला असून, त्याचा गळीत हंगाम शेतकरी व कामगार हितासाठी ...
कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त केला असून, त्याचा गळीत हंगाम शेतकरी व कामगार हितासाठी सुरूच राहावा, यासाठी संस्थापक-संचालक मंडळाने शनिवारी दुपारी नवी दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले-पाटील, संचालक दत्तूभाऊ धुमाळ, शहाजी भोईटे, श्रीरंग सापते व किसनराव घाडगे यांनी मंत्री राणे यांना सविस्तर निवेदन सादर केले आणि कारखान्याबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.
‘मुख्यमंत्री असताना, मी कारखान्यावर येऊन गेलो आहे, डॉ. शालिनीताई पाटील यांनी घेतलेले परिश्रम आणि केलेला त्याग पाहिला आहे. त्यामुळे कदापि अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल,’ अशी भूमिका मंत्री राणे यांनी मांडली.
कारखाना ईडीने जप्त करून १७ दिवस उलटले आहेत. ईडीच्या कारवाईनंतर संस्थापक-संचालक मंडळाने कारखाना ताब्यात मिळविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी मुंबईत त्यांनी ईडीच्या सहसंचालकांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी नवी दिल्लीत दाखल होत, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
फोटोनेम : जरंडेश्वर नारायण राणे चर्चा. जेपीजी.
नवी दिल्ली येथे शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा करताना किसनराव घाडगे, शंकरराव भोसले-पाटील, दत्तूभाऊ धुमाळ, शहाजी भोईटे, श्रीरंग सापते उपस्थित होते.