Satara: पासष्ट वर्षांपासून होतोय नावेतून प्रवास, वाहगाव ते नडशीदरम्यान कृष्णा नदीतून वाहतूक
By दीपक शिंदे | Published: April 13, 2024 04:57 PM2024-04-13T16:57:05+5:302024-04-13T16:57:18+5:30
शंकर पोळ कोपर्डे हवेली : नदी ओलांडून जाण्यासाठी पूर्वी नावेचा वापर केला जायचा; मात्र सध्या तंत्रज्ञान युगात नदीवर पुलांची ...
शंकर पोळ
कोपर्डे हवेली : नदी ओलांडून जाण्यासाठी पूर्वी नावेचा वापर केला जायचा; मात्र सध्या तंत्रज्ञान युगात नदीवर पुलांची ठिकठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे. परिणामी त्या ठिकाणच्या नावांचा वापर बंद झाला; पण या परिस्थितीत वाहगाव, नडशी या गावांदरम्यान अलीकडून पलीकडे करण्यासाठी सुमारे पासष्ट वर्षांपासून नावेतून प्रवास केला जात आहे.
वाहगाव, खोडशी, वनवासमाची आदी गावांतील ग्रामस्थांबरोबर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी नदी पार करण्यासाठी नावेचाच वापर करतात. तर नडशी, यशवंतनगर, कोपर्डे हवेली, पिंपरी, शाहापूर, उत्तर कोपर्डे गावातील ग्रामस्थ वाहगाव, खोडशी, गावाला जाण्यासाठी नावेचा वापर करतात. यामुळे अंतर कमी होऊन वेळेची आणि पैशांची बचत होते. नावचालकाला नावाड्या म्हणून ओळखले जाते. सध्या नावाड्याची तिसरी पिढी नाव चालवण्याचे काम करीत आहे. सध्या प्रत्येकी पाच रुपये, तर पाच घेऊन दुचाकी नावेतून घेतले जातात.
जुन्या नावेची मोडतोड झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी लोकवर्गणी आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी नाव विकत घेतली. काही वर्षांनंतर सातारा जिल्हा परिषद यांच्या फंडातून नाव देण्यात आली. वेळोवेळी नावेत बदल होत गेले. काही वर्षे कायलेतून नदी प्रवास केला जात होता; पण तो प्रवास धोक्याचा असल्याने अधिक काळ नावेचाच वापर होता. नदीची खोली वाढल्याने नदीच्या दोन्ही काठांवर दोर बांधून प्रवास सुरू आहे.
..त्यामुळे प्रवासासाठी नावेचा आधार
नडशी आणि वाहगावच्या हद्दीत कृष्णा नदी वाहते. नडशी ग्रामस्थांना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी दहा किलोमीटर अंतर आहे. तर नावेतून प्रवास करून हे अंतर केवळ तीन किलोमीटर भरते. वाहगावच्या लोकांना कऱ्हाड-मसूर; तसेच सह्याद्री साखर कारखान्याकडे जाण्यासाठी दहा ते बारा किलोमीटर अंतर भरते. तर नावेने प्रवास केल्यास हे अंतर अडीच ते तीन किलोमीटर भरते. त्यामुळे अनेक लोक प्रवासासाठी नावेचा आधार घेतात.
१९७६ च्या महापुरात नावेची मोडतोड..
पूर्वी नाव चालवण्यासाठी कळकाचा तागा वल्हे होते. त्याचा वापर करून नाव चालवली जायची. १९७६ मध्ये कृष्णा नदीला महापूर आला होता. त्यामध्ये नाव पाण्यातून वाहून गेली. महापूर ओसरल्यानंतर सापडली मात्र मोठे नुकसान झाले होते. नवीन नाव येईपर्यंत कायलेचा वापर करण्यात येत होता.
गेल्या तीन पिढ्या आमच्या नाव चालवण्याचे काम करतात. लोकांची सेवा होती आणि आम्हाला चार पैसे मिळतात. - शब्बीर मुल्ला, नावचालक वाहगाव,
गेल्या अनेक वर्षांपासून नडशी, वाहगाव, कृष्णा नदीवर नाव आहे. मधला मार्ग म्हणून परिसरात लोक नावेचा वापर करतात. - जगन्नाथ पवार, पोस्टमास्तर वाहगाव