नदीपात्रात वाहून गेलेल्या क्षितिजाचा मृतदेह सापडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 03:16 PM2019-11-17T15:16:59+5:302019-11-17T15:17:58+5:30
अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नातेवाईकांचा ठिय्या
ढेबेवाडी : वांग नदीपात्रातून वाहून गेलेल्या क्षितिजा साठे (वय १२, रा. सणबूर, ता. पाटण) या शाळकरी विद्यार्थिनीचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी रविवारी सकाळी ढेबेवाडी नजीकच्या पूलाजवळ नदीपात्रालगत सापडला. क्षितिजाच्या मृत्यूस वांग धरण बांधकाम प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी नकार देऊन तेथेच ठिय्या मांडला.
वांग नदीवर रविवारी सकाळपासून मोठा जमाव जमला होता. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतल्याने वांग नदीच्या काठावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शंकर साठे (वय ६२) हे त्यांच्या नाती स्वरांजली साठे (वय १०), श्रावणी साठे (वय १०), क्षितीजा साठे (वय १२), हे गुरुवारी,दि. १४ रोजी सकाळी नऊच्या सुमारास वांग नदीपात्र ओलांडून गावाकडे जात होते. यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते मोरेवाडी (कुठरे) नजीकच्या वांग नदीपात्रातून वाहून गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या स्थानिकांनी शंकर साठे यांच्यासह स्वरांजली आणि श्रावणी यांना वाचविण्यात यश आले. तर क्षितिजा पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याने ती सापडू शकली नव्हती. दरम्यान, चार दिवसांपासून नदीपात्रात शोधमोहीम चालू होती. अखेर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्षितिजाचा मृतदेह वांग नदीपात्रात ढेबेवाडीनजीकच्या पूलाजवळ सापडला.
मृतदेह सापडल्यानंतर ग्रामस्थांनी वांग नदीकाठी सकाळपासून गर्दी केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्या पंचनाम्याच्या बाबी पूर्ण केल्या. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यापूर्वी विरोध केला. या घटनेला जबाबदार असणाºयांवर कारवाई करावी आणि संबंधित अधिकारी येथे आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला.