मुलीचा मृतदेह अखेर बेवारस म्हणून दफन
By admin | Published: July 10, 2017 02:29 PM2017-07-10T14:29:52+5:302017-07-10T14:29:52+5:30
संगममाहुली नदीत आढळला होता मृतदेह
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि.१0 : येथील संगम माहुली नदीत आढळलेल्या दहा वर्षाच्या मुलीच्या मृतदेहाची पाचव्या दिवशीही ओळख पटली नाही. त्यामुळे संबंधित मुलीचा मृतदेह पोलिस आणि पालिका प्रशासनाने अखेर बेवारस म्हणून रविवारी दफन केला.
संगम माहुली नदीमध्ये बुधवार दि ५ रोजी सायंकाळी काही ग्रामस्थांना नदीकाठी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी अंदाजे अकरा वर्षांच्या मुलाचा मृतदेह असल्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. होता, परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये हा मृतदेह मुलाचा नसून अंदाजे दहा वर्षांच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले होते.
४८ तासांपेक्षा जास्त वेळ संबंधित मुलगी नदीमध्ये असल्यामुळे तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्या मुलीची ओळख पटली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या पोलिस ठाण्यात लहान मुलगी बेपत्ता आहे का, याची पोलिसांनी माहिती घेतली. मात्र तशाप्रकारची कोठेच नोंद नसल्याचे समोर आले आहे. या मुलीला कोणीतरी बाहेरहून आणून या ठिकाणी टाकले असण्याची शक्यता असून या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मुलीचा मृतेदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात होता. त्या मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. मात्र अखेर ओळख पटलीच नाही. त्यामुळे रविवारी दुपारी पोलिसांनी या मुलीचा मृतदेह बेवारस म्हणून दफन केला.