केळवली धबधब्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, वडिलांचा व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:37 PM2022-07-26T17:37:59+5:302022-07-26T17:38:21+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांना मृतदेह शोधण्यात यश
सातारा : सातारा तालुक्यातील केळवली धबधब्यात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी बुडालेल्या तरुणाचा चौथा दिवशी म्हणजे आज, मंगळवारी सकाळी सात वाजता मृतदेह सापडला. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर काही वेळातच तरुणाचा मृतदेह धबधब्याच्या खोल पाण्यात आढळून आला. राहुल सुभाष माने (वय १८, रा. विकासनगर सातारा) असे धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका महाविद्यालयातील सहा ते सातजण केळवली धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी राहुल माने हा अचानक धबधब्यात गायब झाला. याची माहिती पोलीस व त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर सर्वजण धबधब्याजवळ पोहोचले; मात्र अंधार असल्यामुळे सर्वजण परत आले. दुसऱ्या दिवशी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. सलग तीन दिवस पोलीस व रेस्क्यू टीमच्या जवानांकडून राहुल मानेचा शोध घेतला जात होता. आज, मंगळवारी सकाळी सात वाजता पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी धबधब्यातील खोल पाण्यात राहुल मानेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
वडिलांचा व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा
राहुल माने हा वडिलांना घरातून न सांगताच मित्रांसोबत फिरायला गेला होता. मात्र, धबधब्याजवळ गेल्यानंतर त्याने वडिलांना व्हिडिओ कॉल केला. मी मित्रांसोबतच आहे. घरी संध्याकाळी लवकर येतो असे तो म्हणाला. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, एवढ्या लांब कशाला गेलास. जवळच फिरून घरी यायचे ना; पण त्याने आता मी आलोय. असं सांगून फोन ठेवला. बाप-लेकाचा हा व्हिडिओ काॅल शेवटचा ठरला.