पसरणी घाटात आढळला महिलेचा मृतदेह, घातपाताचा संशय; तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 11:58 IST2018-05-11T11:58:35+5:302018-05-11T11:58:35+5:30
वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, संबंधित महिलेची हत्या करून मृतदेह दरीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

पसरणी घाटात आढळला महिलेचा मृतदेह, घातपाताचा संशय; तपास सुरू
पसरणी : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, संबंधित महिलेची हत्या करून मृतदेह दरीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई शहरासह परिसरात राहणारे नागरिक दररोज सकाळी पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी येतात. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांकडून घाटातील सुमारे वीस फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर वाई पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोरीच्या साह्याने व नागरिकांच्या मदतीने संबंधित महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
एक ते दोन दिवसांपासून हा मृतदेत दरीत पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, दरीत मृतदेह आढळल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.