बोगदा - राजवाडा रस्ता पुन्हा खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:48+5:302021-05-05T05:02:48+5:30
सातारा : परळी खोऱ्याला जोडणाऱ्या बोगदा - राजवाडा या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या मार्गावरून ये - जा ...
सातारा : परळी खोऱ्याला जोडणाऱ्या बोगदा - राजवाडा या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या मार्गावरून ये - जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.
बोगदा ते राजवाडा या मार्गावर नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. सध्या संचारबंदीमुळे ही वर्दळ थांबली असली तरी नागरिकांना खड्ड्यांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होताच पालिकेकडून या मार्गावरील खड्डे खडी व मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून अधून-मधून बरसत असलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खडी पुन्हा उखडली असून, परिस्थिती जैसे थे झाली आहे. त्यामुळे नक्की कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली होती.
कास, यवतेश्वर, सज्जनगड, ठोसेघर अशा प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.
फोटो :
साताऱ्यातील समर्थ मंदिर चौक ते बोगदा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.